१२ धार्मिक स्थळ जमिनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 10:23 PM2018-07-20T22:23:06+5:302018-07-20T22:24:36+5:30
स्थानिक न.प.ने दिलेल्या लेखी सुचनांकडे पाठ केल्याने शुक्रवारी न.प.च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेवून शहरातील सुमारे १२ धार्मिक स्थळ जमिनदोस्त केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत सुरूच होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक न.प.ने दिलेल्या लेखी सुचनांकडे पाठ केल्याने शुक्रवारी न.प.च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेवून शहरातील सुमारे १२ धार्मिक स्थळ जमिनदोस्त केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत सुरूच होती.
शहरातील बहूतांश धार्मिक स्थळ रहदारिस व शहर विकासाच्या कामात अडथळा निर्माण करीत असल्याचे कारण पुढे करीत त्यांना नोटीस बजावण्यात आला होता. सदर नोटीस बजावल्यानंतर काही धार्मिक स्थळ यापूर्वी न.प.च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने जमिनदोस्त केली होती. त्यानंतर आज ही मोहीम पुन्हा नव्या जामाने राबविण्यात आली. शुक्रवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिवाजी चौक, धंतोली, न्यु इंग्लिश शाळा, गोंडप्लॉट व सुदामपुरी भागातील अतिक्रमण करून बांधण्यात आलेली सुमारे १२ धार्मिक स्थळे जेसीबीच्या सहाय्याने पाडली.
ही मोहीम न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनात न.प. प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, सुधीर फरसोले, अशोक वाघ, दिनेश नेरकर, सतीश जाधव, प्रविण बोरकर, रवी जगताप, चेतन खंडारे, चेतन कहाते, गजानन पेटकर, ऐजाज फारुकी, मुकीम शेख, स्वप्नील खंडारे, चंदन महत्त्वाने, प्रदीप मुनघाटे, नाना परटक्के, आशीष गायकवाड, निखिल लोहवे, अशोक ठाकूर, प्रविण बोबडे, विशाल सोमवंशी, बाळकृष्ण भोयर, मनिष मानकर, सुजीत भोसले, जगदीश गौतम, अक्षय बालेगिनवार, आकाश मरघडे, नितीन जांभुळकर आदींनी केली.
अन्यथा शिवसेना उतरेल रस्त्यावर - सराफ
सार्वजनिक जागेवरील धार्मिक स्थळ पाडण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्या अनुषंगाने शहरातील धार्मिक स्थळे पाडण्याचे काम न.प. प्रशासन करीत आहे. या मोहिमेमुळे अनेकांच्या भावना दुखावत असून नागरिकांकडून त्याचा विरोधही होत आहे. न.प. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुठल्याही मंदिरातील मूर्तीची विटंबना करून लोकांच्या भावना दुखावू नये. असे झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल, अशा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश सराफ यांनी सदर मोहीम सुरू असताना न.प. अधिकाऱ्यांशी भेटून दिला. यावेळी शिवसेनेचे किशोर बोकडे, बादल श्रीवास, संजय पांडे, कुणाल मोरे, अमर गुंदी, विशाल व्यास आदींची उपस्थिती होती.