मराठी शाळांकडे १,२९४ विद्यार्थ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 06:00 AM2019-12-27T06:00:00+5:302019-12-27T06:00:15+5:30
जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक ९२१ शाळा आहेत. त्यासोबतच नगरपालिका आणि खाजगी शाळांचा विचार केल्यास एकूण शाळांची संख्या १४४६ इतकी आहे. या शाळांच्या इमारती आणि सुविधांच्या तुलनेत इंग्रजी माध्यमांच्या शाळा भक्कम असल्याने या दिखाव्यावरच पालकांची नजर खिळली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मिळणारे प्रोत्साहन आणि मराठी शाळांच्या देखभाल दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे मराठी शाळांमधील पटसंख्या झपाट्याने कमी होऊन शाळा बंद करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्राथमिक व माध्यमिक शाळांतील पटसंख्या १ हजार २९४ ने कमी झाल्यामुळे शिक्षकांच्या समायोजनाचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक ९२१ शाळा आहेत. त्यासोबतच नगरपालिका आणि खाजगी शाळांचा विचार केल्यास एकूण शाळांची संख्या १४४६ इतकी आहे. या शाळांच्या इमारती आणि सुविधांच्या तुलनेत इंग्रजी माध्यमांच्या शाळा भक्कम असल्याने या दिखाव्यावरच पालकांची नजर खिळली आहे. परिणामी खिशाला झळ सोसत पालकांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे आपला मोर्चा वळविला आहे. याचाच फटका जिल्हा परिषदसह खासगी मराठी शाळांना बसला आहे. विशेषत: जिल्हा परिषदेच्या काही शिक्षकांनी पदमोड करुन पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. अनेक शाळा आयएसओ मानांक न प्राप्त असून आंतरराष्ट्रीय शाळांकेड कूच केली आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही लाजवेल अशा काही मराठी शाळा असतानाही पालकांच्या कॉन्व्हेंट क्रेझमुळे या शाळांची पटसंख्या घसरतच आहे. सन २०१७-१८ मध्ये संचमान्यतेनुसार आठही तालुक्यातील प्राथमिक विभागातील पटसंख्या ३८ हजार ८९९ इतकी होती. ती २०१८-१९ मध्ये ३८ हजार ०४ इतकी झाली तर माध्यमिकची पटसंख्या ८ हजार ८९८ वरुन ८ हजार ४९९ वर आल्याने प्राथमिक व माध्यमिक विभागातील पटसंख्या १ हजार २९४ ने कमी झाली आहे. त्यामुळे मराठी शाळांना अच्छे दिन आणण्याकरिता शासन स्तरावरुनच उपाययोजना होणे गरजेचे आहे.
शिक्षकांवरही गंडांतर
जिल्ह्यातील आठही तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील २०१७-१८ मधील पटसंख्या ४७ हजार ७९७ असल्याने मुख्याध्यापक, सहाय्यक मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, पदवीधर शिक्षक, सहाय्यक शिक्षक यासह इतर शिक्षकांची एकूण २ हजार ९३० पदे मंजूर होती. त्यापैकी २ हजार ७९५ पदे भरली गेली होती तर १७८ पदे रिक्त आणि ४३ शिक्षक अतिरिक्त ठरले होते.
तर २०१८-१९ मध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांतील पटसंख्या ४५ हजार ५०३ वरच आली. त्यामुळे याचा परिणाम शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या पदावरही झाला आहे. पटसंख्ये अभावी यावर्षीकरिता २ हजार ८९८ पदांना मजुरी देण्यात आली होती. त्यापैकी २ हजार ८८० पदावर कर्मचारी कार्यरत असून १०९ पदे रिक्त आहे. त्यामुळे तब्बल ९१ शिक्षक अतिरिक्त ठरले आहे.