जिल्ह्यात सिकलसेलचे तब्बल 13 हजार 703 वाहक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 05:00 AM2022-06-24T05:00:00+5:302022-06-24T05:00:01+5:30
महाराष्ट्र राज्यात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून सुरू झाला. त्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या आरोग्य विभागानेही वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून या उपक्रमाला शहरी व ग्रामीण भागात वेळोवेळी गती दिली. याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील १ हजार ९१ सिकलसेल बाधितांना शोधण्यात यश आले आहे. इतकेच नव्हे तर सिकलसेलचे तब्बल १३ हजार ७०३ वाहक शोधण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या १४ लाखांच्या घरात असली तरी छोट्याशा वर्धा जिल्ह्यात सिकलसेलचे तब्बल १३ हजार ७०३ वाहक असल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. याच रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आता विशेष उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्र राज्यात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून सुरू झाला. त्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या आरोग्य विभागानेही वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून या उपक्रमाला शहरी व ग्रामीण भागात वेळोवेळी गती दिली. याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील १ हजार ९१ सिकलसेल बाधितांना शोधण्यात यश आले आहे. इतकेच नव्हे तर सिकलसेलचे तब्बल १३ हजार ७०३ वाहक शोधण्यात आले आहेत. याच रुग्णांना त्यांनी पुढील जीवन कसे जगावे याबाबत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जात आहे.
तीन प्रकारच्या टेस्टने केले जाऊ शकते निदान
- सोल्युबिलीटी चाचणी : सिलक हिमोग्लोबीनचे अस्तित्व आहे किंवा नाही ही चाचणी सर्व शासकीय आरोग्य संस्था स्तरावर करण्यात येते.
- इलेक्ट्रोफोरेसीस चाचणी : सोल्युबिलीटी चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर इलेक्ट्रोफोरेसीस चाचणी करून सिकलसेल वाहक वा सिकलसेल रुग्ण यांचे निदान केले जाते. ही चाचणी जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे केली जाते.
- एचपीएलसी चाचणी : या चाचणीमुळे संपूर्ण रक्तातील पेशींची मोजणी करून रक्तपेशींची संख्या, आकार व हिमोग्लोबिनची पातळी याचा बोनमॅरो योग्य प्रकारे काम करीत आहे किंवा नाही याचा शोध घेतला जातो.
सिकलसेलची लक्षणे
- रक्तक्षय कमतरता, प्लिहेचा आकार वाढणे, हात-पाय सुजणे, चेहरा निस्तेज होणे, सांधे दुखणे, वारंवार सर्दी-खोकला होणे, ताप राहणे, थकवा येणे, जंतुसंसर्ग आदी सिकलसेलची लक्षणे आहे. ही लक्षणे दिसल्यास तातडीने रुग्णालयात जात डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे गरजेचे आहे.
सिकलसेल बाधितांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. योग्य वेळी योग्य औषधोपचार व रक्त पुरवठा करण्यात आला तर सिकलसेल रुग्णदेखील चांगले आयुष्य जगू शकतो. शिवाय रुग्णाला मानसिक आधार देणे गरजेचेच आहे.
- डॉ. रा. ज. पराडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.