मृदा आरोग्य पत्रिकांसाठी १३ हजार नमुने
By admin | Published: July 14, 2016 02:11 AM2016-07-14T02:11:32+5:302016-07-14T02:11:32+5:30
सततच्या नापिकीवर उपाययोजना करतानाच शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या. यात शेतातील मातीची
गतवर्षीचे उद्दीष्ट पूर्ण : पाण्याचीही करण्यात आली तपासणी
पराग मगर वर्धा
सततच्या नापिकीवर उपाययोजना करतानाच शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या. यात शेतातील मातीची तपासणी करून मृता आरोग्य पत्रिका देण्याच्या योजनेचा समावेश आहे. गतवर्षी सुरू झालेल्या या योजनेत यंदा बुधवारपर्यंत १३ हजार नमूने घेण्यात आले आहेत. गतवर्षी शासनाने दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यात आले आहे.
कृषी विभागामार्फत शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना हाती घेतल्या. यातीलच एक म्हणजे मृदा आरोग्य पत्रिकांचे वितरण होय. मागील वर्षी सुरू झालेल्या या योजनेत १५ हजार ८३६ मातीचे नमूने घेण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. कृषी विभागाच्या मृद सर्वेक्षण विभागाद्वारे हे उद्दीष्ट पूर्ण करण्यात आले आहे. यात ३६ हजार ५२८ मृदा आरोग्य पत्रिकांचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. २०१५-१६ मधील उद्दीष्ट पूर्ण केल्यानंतर २०१६-१७ साठी ३१ हजार ६७१ नमूने तपासणीचे उद्दीष्ट कृषी विभागाला देण्यात आले आहे. यासाठीही कृषी विभागाच्या मृद सर्वेक्षण विभागाने नमूने घेतले आहेत. आजपर्यंत १३ हजार नमूने घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना अद्याप मृदा आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आलेले नाही. सर्व नमून्यांची तपासणी करण्यात येत आहे. शासन नियमाप्रमाणे एक महिन्याच्या आत मृदा आरोग्य पत्रिका देणे गरजेचे आहे; पण ही योजना असल्याने अधिक कालावधी देण्यात आलेला आहे. मुदतीमध्येच या मृदा आरोग्य पत्रिका वितरित करण्यात येणार असल्याचे मृद सर्वेक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.