‘त्या’ १३ गावांचा होणार विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 09:56 PM2019-07-08T21:56:16+5:302019-07-08T21:56:44+5:30
शहरासह वर्धा शहरानजीकच्या १३ गावांमधील एकूण ३६ हजार कुटुंबीयांना यंदा भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागले. नागरिकांची समस्या व भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन पाटबंधारे विभागाचे पालक सचिव चहल यांनी वर्धेत घेतलेल्या आढावा बैठकीदरम्यान महाकाळी येथील धाम प्रकल्पाचे पाणी नवीन जलवाहिनी टाकून येळाकेळीपर्यंत आणण्यासाठीचे इस्टिमेट (प्राकलन) म.जी.प्रा.ला तयार करण्याच्या सूचना दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरासह वर्धा शहरानजीकच्या १३ गावांमधील एकूण ३६ हजार कुटुंबीयांना यंदा भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागले. नागरिकांची समस्या व भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन पाटबंधारे विभागाचे पालक सचिव चहल यांनी वर्धेत घेतलेल्या आढावा बैठकीदरम्यान महाकाळी येथील धाम प्रकल्पाचे पाणी नवीन जलवाहिनी टाकून येळाकेळीपर्यंत आणण्यासाठीचे इस्टिमेट (प्राकलन) म.जी.प्रा.ला तयार करण्याच्या सूचना दिल्या. सध्या हे काम कासवगतीने होत असून महाकाळी ते येळाकेळी यादरम्यानच्या १३ गावांनाही पाणी कसे देता येईल, याविषयीचा विचार सध्या केला जात आहे.
महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची उचल येळाकेळी व पवनार येथून वर्धा न.प. आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करते. त्यानंतर सदर पाणी शुद्ध करून त्याचा पुरवठा सुमारे ३६ हजारांच्या वर कुटुंबीयांना केला जातो. परंतु, मागील दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने यंदा धाम प्रकल्पातही पुरेसा जलसाठा नव्हता. त्यामुळे या प्रकल्पातील पाण्याचे नियोजन जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांवरून वर्धा पाटबंधारे विभागाने केल्याने नागरिकांनाही पिण्या योग्य पाणी मिळाले. भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी धाम प्रकल्पातील पाणी भूमिगत जलवाहिनीद्वारे येळाकेळीपर्यंत आणण्याच्या विषयावर १४ मे रोजी पार पडलेल्या बैठकीत पालक सचिव चहल यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने सदर प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राकलन तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मजीप्राने सर्वेक्षण केले. परंतु, प्रकलनाला अंतिम रूप अद्याप देण्यात आलेले नाही.
२६ कि.मी. टाकावी लागणार जलवाहिनी
महाकाळी येथील धाम प्रकल्पातील पाणी भूमिगत जलवाहिनीद्वारे येळाकेळीपर्यंत आणण्यासाठी २६ किमीची जलवाहिनी टाकावी लागणार असल्याचे सांगण्यात आले.
महिना लोटला; अधीक्षकांकडून दखल नाही
महाकाळी ते येळाकेळीपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकून धाम नदीचे पाणी वर्धेपर्यंत आणण्यासाठी प्राकलन तयार करण्याच्या सूचना मिळाल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वर्धाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरच्याच अधीक्षक अभियंत्यांना १६ मे २०१९ ला एक पत्र पाठवून मार्गदर्शन मागितले आहे. हे पत्र पाठवून महिना लोटला असून अद्याप वर्धा कार्यालयाला त्यावर उत्तर देण्यात आलेले नाही, हे विशेष.
या गावांचा होतोय विचार
आर्वी तालुक्यातील काचनूर, खरांगणा, मोरांगणा, कासारखेडा, सावध, सेलू तालुक्यातील खैरी, सुकळी, खेर्डा तर वर्धा तालुक्यातील मजरा, कामठी, आंजी (मोठी), डोर्ली, डुर्ला या गावांना नवीन जलवाहिनीद्वारे पाणी कसे देता येईल याचा विचार सध्या प्राकलन तयार करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाºयांकडून केला जात आहे. जलवाहिनी टाकताना विविध ठिकाणी टॅपींग पॉर्इंट तयार करण्यात येणार असून तेथून ही गावे पाण्याची उचल करू शकणार असल्याचे सांगण्यात आले.
पूर्वी झाला वर्धा शहरासह नजीकच्या १३ गावांचाच विचार
सुरूवातीला वर्धा शहर आणि शहराशेजारील १३ गावांना पाणी पुरवठा कसा करता येईल याचा विचार झाला. परंतु, नंतर महाकाळी ते येळाकेळी दरम्यानच्या तब्बल १३ गावांना याच भूमिगत जलवाहिनीद्वारे कसे पाणी देता येईल याचा विचार झाला. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाशी पत्र व्यवहार करण्यात आला. नुकतेच त्या पत्रावर जि.प. च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून उत्तर देण्यात आले आहे.