विदर्भात उन्हाचा कहर; शाळांना १४ दिवस अधिकच्या सुट्ट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2022 04:37 PM2022-04-15T16:37:41+5:302022-04-15T17:38:30+5:30
विदर्भात तापमान अधिक असल्याने आगामी नवीन शैक्षणिक सत्र विदर्भ वगळता इतर जिल्ह्यांमध्ये १२ जूनपासून सुरू होणार आहे
वर्धा :विदर्भात सूर्यनारायण सध्या आग ओकत आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विदर्भात तापमान अधिक असल्याने आगामी नवीन शैक्षणिक सत्र विदर्भ वगळता इतर जिल्ह्यांमध्ये १२ जूनपासून सुरू होणार आहे; परंतु विदर्भातील शाळा २७ जूनपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे राज्यभरात एकाचवेळी सर्व शाळांना सुट्ट्या लागणार असल्या तरी विदर्भातील शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या १४ दिवस अधिकच्या मिळणार आहेत.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याने इयत्ता पहिली ते नववी व अकरावीच्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळणार की नाही? मिळाल्या तरी किती दिवसांच्या असतील? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्याही मनात निर्माण झाले होते. अखेर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सन २०२१-२२ च्या उन्हाळी सुट्ट्या व सन २०२२-२३ चे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत परिपत्रक काढले आहे.
त्यानुसार संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्याकरिता २ मे पासून उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागू करण्यात आल्या आहेत. तसेच नवीन शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. जून महिन्यातही विदर्भातील तापमान अधिक राहत असल्याने विदर्भातील शाळा दरवर्षीप्रमाणे २७ जूनपासून सुरू होणार आहेत. शासनाच्या या निर्णयाने विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही दिलासा मिळाला आहे.