१४ गावांतील नागरिकांची वनविभागावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 10:56 PM2018-05-28T22:56:36+5:302018-05-28T22:57:05+5:30
बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत निर्माण झालेल्या समस्या वनविभागाच्या कानावर घालण्याकरिता आधार संघर्ष समितीने नेतृत्वात १४ गावांतील नागरिकांचा समावेश असलेली ‘वनमंत्री मुखदर्शन आंदोलन’ची पदयात्रा सोमवारी वर्धेत जिल्हा उपवनसंरक्षकांच्या कार्यालयावर धडकली. यावेळी आंदोलकांनी कार्यालयात ठिय्या मांडला. दरम्यान, वन अधिकाऱ्यांनी बोर व्याघ्र प्रकल्पातील नागरिकांच्या समस्या मार्गी काढाव्या, अशी मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत निर्माण झालेल्या समस्या वनविभागाच्या कानावर घालण्याकरिता आधार संघर्ष समितीने नेतृत्वात १४ गावांतील नागरिकांचा समावेश असलेली ‘वनमंत्री मुखदर्शन आंदोलन’ची पदयात्रा सोमवारी वर्धेत जिल्हा उपवनसंरक्षकांच्या कार्यालयावर धडकली. यावेळी आंदोलकांनी कार्यालयात ठिय्या मांडला. दरम्यान, वन अधिकाऱ्यांनी बोर व्याघ्र प्रकल्पातील नागरिकांच्या समस्या मार्गी काढाव्या, अशी मागणी केली.
ही पदयात्रा उपवनसंरक्षक कार्यालयवर पोहोचल्याची माहिती खा. रामदास तडस यांना मिळताच तेही वनविविभागाच्या कार्यालयात पोहोचले. खा. तडस व आंदोलनाचे नेतृत्व करणारे हरिष इथापे, भास्कर इथापे यांच्यासह संघर्ष समितीत असलेल्या इतर सदस्यांच्या उपस्थितीत त्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातील मागण्या मान्य करण्याची मागणी आंदोलकांनी केली. यावर खा. तडस यांनी वनमंत्री मुंबईत असल्याने त्यांची भेट घेणे सध्या शक्य नाही. त्यांची तारीख घेवून ३० मे पूर्वी नागपूर येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आधार संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांची बैठक घेण्यात येईल. त्याची तारीख लवकरच कळवू असे आश्वासन खा. तडस यांनी आंदोलकांना दिले. या आश्वासनावर आंदोलकांनी माघार घेतली. यावेळी वनविभागाचे अधिकारीही उपस्थित होते.
वनमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत काय निर्णय होतो. यावर आंदोलनाची पुढील भूमिका ठरवू, अशी माहिती हरिष इथापे यांनी दिली. वनमंत्री मुखदर्शन आंदोलनात सेलू तालुक्यातील सालई (कला) या गावातून निघालेली पदयात्रा रविवारी रात्री वर्धेतील धुनिवाले मठ चौकात पोहोचली. येथे मुक्काम करून ही पदयात्रा आज सकाळी १० वाजता शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत उपवनसंरक्षकाच्या कार्यालयावर धडकली. पदयात्रा येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाºयांना असल्याने येथे सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बोर व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली; पण बाधित गावांच्या पुनर्वसनाकडे लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शिवाय वाघांच्या हल्ल्यात गुरांसह मनुष्यांनाही जीव गमवावा लागत आहे. यामुळे शासनाला जागे करण्यासाठी बोर व्याघ्र प्रकल्प पुनर्वसन आधार संघर्ष समितीने वनमंत्री मुखदर्शन आंदोलन सुरू केले आहे.
यासाठी शनिवारपासून आमगाव ते वर्धा वन विभाग कार्यालय, अशी पदयात्रा आरंभली होती. प्रशासन जागे करण्यासाठी हरिष इथापे व तब्बल १४ गावांतील युवक, सामाजिक कार्यकर्त्यांनी आमगाव (जंगली) ते वनविभाग कार्यालय वर्धा अशी पदयात्रा काढत वनमंत्री मुखदर्शन आंदोलन सुरू केले होते. आज त्याचा समारोप झाला.
वनविभागाचे अधिकारी सुरक्षा घेऱ्यात
पदयात्रा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या उपवनसरंक्षकांच्या कार्यालयावर धडकली. याची माहिती विनभागाच्या अधिकाºयांना असल्याने त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणेला पाचारण केले होते. उपवनसंरक्षकांच्या कार्यालयालयाला यावेळी पोलीस छावणीचे स्वरूप आल्याचे दिसले. आंदोलन शांतेच्या मार्गाने असताना शासनाकडून एवढी सुरक्षा कशाला, अशी चर्चा आंदोलक करीत होते.