स्पार्किंगमुळे १४ चाकी ट्रकला आग; नोटांचे 'स्क्रॅप' खाक!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 05:10 PM2024-11-11T17:10:10+5:302024-11-11T17:11:50+5:30
कांढळी ते बरबडी रस्त्यावरील घटना : सुदैवाने जीवितहानी टळली
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भारतीय चलनातील नोटांचे स्क्रैप भरून मुजफ्फरनगर येथे जात असलेल्या १४ चाकी ट्रकला अचानक आग लागली. ही घटना ९ रोजी मध्यरात्री २:३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रकमधील नोटांचे स्क्रैप पूर्णतः जळून खाक झाले. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली.
प्राप्त माहितीनुसार, चालक जसवंत सिंग त्रिलोक सिंग (४५, रा. मेरठ, उत्तर प्रदेश) आणि सहचालक भोपाळ दाताराम (६०) हे दोघे (यूपी १२ सीटी ५३२७) क्रमांकाच्या ट्रकमध्ये भारतीय चलनातील नोटांचे स्क्रैप भरून हैदराबाद ते मुजफ्फरनगर येथे जात कांढळी ते होतेया दरम्यान शिवारात बरबडी स्पार्किंग झाल्याने ट्रकने पेट घेतला. दरम्यान, ट्रकमधील नोटांचे स्क्रैप जळून खाक झाले. याची माहिती जाम महामार्ग पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आगीवर पाण्याचा मारा करून आग विझविण्यात आली. सुदैवाने जीवितहानी टळली.
वाहतूक केली सुरळीत
अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिस आणि हिंगणघाट पोलिसांनी धाव घेतली. आगीची घटना घडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, महामार्ग पोलिसांच्या सेफ्टी टीमने तसेच आग विझविल्यानंतर हायड्राच्या मदतीने जळलेला ट्रक रस्त्याकडेला हलवून महामार्गा- वरील वाहतूक सुरळीत केली.
दिवसभर उलटसुलट चर्चेला उधाण
कांढळी मार्गावर नोटांचे स्क्रॅप भरून नेणाऱ्या ट्रकला आग लागली. या आगीत स्क्रॅप जळून खाक झाले. मात्र, नोटांचा अंश असलेले काही कागद अर्धवट जळाले. नागरिकांनी जळालेल्या ट्रकची पाहणी केली तसेच काहींनी फोटो, व्हिडीओदेखील काढले. यात जळालेल्या कागदांमध्ये नोटांचे स्क्रॅप असल्याने नागरिकांना हा ट्रक नोटांनी भरला असल्याचा संशय आला आणि त्यांनी विविध समाज- माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल करून नोटा भरलेल्या ट्रकला आग लागल्याचे दाखविले. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.