...अखेर 'त्या' बालकाची मृत्यूशी झुंज संपली; बालदिनी मृतदेहाला मुखाग्नी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 02:25 PM2022-11-15T14:25:19+5:302022-11-15T14:49:38+5:30
हृदयद्रावक घटनेने पेठ गाव शोकाकुल
गिरड (वर्धा) : मागील दीड महिन्यांपासून बालकाची मृत्यूशी झुंज अखेर संपली असून, योगेश राजू नेहारे (१४) याची प्रकृती खालावल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने पेठ गावातील नागरिक शोकमग्न झाले असून, एकुलता एक मुलगा दगावल्याने नेहारे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पेठ गावातील रहिवासी योगेश नेहारे आणि त्याच्या बहिणीला रात्रीच्या सुमारास मण्यार या विषारी सापाने दंश केला होता. ही घटना १९ सप्टेंबर रोजी गिरडनजीकच्या पेठ गावात घडली होती. दोघांचीही प्रकृती नाजूक असल्याने त्यांना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले होते. काही दिवसांनंतर योगेशला फुप्फुसाचा त्रास होत असल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
मागील पाच ते सहा दिवसांपासून योगेशची प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्याला घरी आणण्यात आले होते. फुप्फुसात संसर्ग झाल्याने अखेर त्याची मृत्यूशी झुंज संपली. योगेश हा एकुलता एक असल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले.