सेवाग्राम विकास आराखड्यातील १४५ कोटींना मान्यता
By Admin | Published: April 9, 2017 12:28 AM2017-04-09T00:28:54+5:302017-04-09T00:28:54+5:30
सेवाग्राम विकास आराखड्यासाठी २६६ कोटी ५३ लाख ७५ हजार रुपयाचा खर्च अपेक्षीत आहे.
जिल्हाधिकारी : कार्यकारी समितीची बैठक
वर्धा : सेवाग्राम विकास आराखड्यासाठी २६६ कोटी ५३ लाख ७५ हजार रुपयाचा खर्च अपेक्षीत आहे. याकरिता मुख्यमंत्र्यांनी १४४ कोटी ९९ लाख ७५ हजार रुपये निधीला मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यातील ३४ कोटी ९८ लाख ९१ हजार रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन करुन कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सेवाग्राम विकास आराखड्या संबंधित आयोजित जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या बैठकीत दिली.
बैठकीला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, सेवाग्राम विकास आराखडा प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार अराडकर, अरुण काळे, पी.पी. पांडे, सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष जयवंत मठकर, सचिव जाधव, मगन संग्रहालयाच्या विभा गुप्ता, नई तालिमच्या सुषमा शर्मा, प्रभाकर पुसदकर, एमगिरीच्या प्रगती गोखे, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता मुन, नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी वाघमळे, सेवाग्रामच्या सरंपच रोशना जामलेकर यांची उपस्थिती होती.
आश्रम परिसरातील सभागृह बांधकाम, यात्री निवास येथील पाण्याच्या टाकीचे बांधकाम, आश्रम व यात्रीनिवासच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम, पवनार येथील आश्रमचे सुशोभिकरण व बांधकाम, यात्रीनिवास येथील सुविधा आदी कामांचा समावेश आहे. यावेळी नवाल म्हणाले, ग्रामपंचायतींनी रस्त्यावरील अतिक्रमीत हॉकर्सला रस्त्यापासून काही अंतरावर जागा उपलब्ध करुन दुकाने बांधुन द्यावी. यामुळे रस्त्याचे सौंदर्यीकरण करुन पादचारी मार्गाचे बांधकाम करणे सोईचे होईल. पवनार ते सेवाग्राम रस्त्याचे चौपदरीकरण होणार असून सेवाग्राम ते गांधी चौकापर्यंत सौंदर्यीकरण करुन पादचारी मार्ग तयार करण्यात येईल. सेवाग्राम येथील अण्णा तलावाचे सुशोभिकरण करणार असल्याचे नवाल यांनी सांगितले. सौंदर्यीकरण व पादचारी मार्ग तयार करण्याची माहिती पीपीटीद्वारे देण्यात आली.(स्थानिक प्रतिनिधी)