१.४७ लाख जनावरांना लाळखुरकुतची लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 01:03 AM2018-03-24T01:03:12+5:302018-03-24T01:03:12+5:30

खुरांच्या जनावरांची कार्यक्षम शक्ती कमी करणारा विषाणुजन्य आजार म्हणले लाळखुरकुत. या आजाराची प्रतिबंधात्मक लस जनावरांना वर्षातून दोन वेळा देणे क्रमप्राप्त आहे;.....

1.47 lakh animals vaccine scavengers | १.४७ लाख जनावरांना लाळखुरकुतची लस

१.४७ लाख जनावरांना लाळखुरकुतची लस

Next
ठळक मुद्देपशुपालकांना होती प्रतीक्षा : ३.५६ लाख जनावरांना प्रतिबंधात्मक लस देणार

ऑनलाईन लोकमत
वर्धा : खुरांच्या जनावरांची कार्यक्षम शक्ती कमी करणारा विषाणुजन्य आजार म्हणले लाळखुरकुत. या आजाराची प्रतिबंधात्मक लस जनावरांना वर्षातून दोन वेळा देणे क्रमप्राप्त आहे;पण गत वर्षभऱ्यापासून सदर लसची प्रतीक्षा जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाला होती. अखेर ही लस १३ मार्चला प्राप्त झाल्यानंतर गुरूवार २२ मार्चपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार ५९० गायसह म्हैस वर्गीय जनावरांना लस देण्यात आली आहे.
पशुसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या सन २०१२ च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात गाय वर्गीय जनावरे ३ लाख ४ हजार ३५९, म्हैस वर्गीय ४८ हजार ७९३, शेळ्या १ लाख ३० हजार ३४२, मेंढ्या १ हजार ६८५ तर २ हजार ८१० वराह आहेत. त्यापैकी गाय व म्हैस वर्गीय जनावरांना सदर लस वर्षातून दोन वेळा देणे क्रमप्राप्त आहे. मात्र, ही लस जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाला एक वर्षापासून प्राप्त झाली नव्हती. ती मिळावी म्हणून वेळोवेळी संबंधीतांकडून वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात आला. अखेर १३ मार्चला लाळखुरकुत या विषाणुजन्य आजाराची ३,५६,१०० प्रतिबंधात्मक लस जिल्ह्याला प्राप्त झाली. ही लस जिल्ह्यातील म्हैस व गाय वर्गीय सर्वच जनावरांना २१ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयातून देण्यात येत आहे. गुरूवार २२ मार्चपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार ५९० गाय व म्हैस वर्गीय जनावरांना देण्यात आली आहे. येत्या काही दिवसात ही लस जिल्ह्यातील सर्वच गाय व म्हैस वर्गाीय जनावरांना देण्यात येणार आहे, असे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जनावरांमध्ये असा होतो संसर्ग व प्रसार
- हे विषाणू लाळ रोग झालेल्या गुरांच्या लाळेत, नाकातील स्त्रावात, खुरातील व्रणात, दुधात आणि वीर्यातही आढळतात.
- रोगी गुरांमधून विषाणू बाहेर पडून गोठ्यातील चारा, पाणी, खाद्य व भोवतालची हवा इत्यादी वस्तू दुषित करतात. -
- गुरांचे बाजार, जत्रा, पशुप्रदर्शन तसेच साखर कारखान्याचे ठिकाणी उस वाहून नेणाºया व जिनिंगचे ठिकाणी कापूस वाहून नेणाºया बैलगाड्या व बैल आणि गाडीवान यांची आवक-जावक वाढून त्यांच्यामार्फत रोगाचा प्रसार होतो.
- जंगलातील प्राण्यांना हा रोग नैसर्गिकरित्या होत असल्याने अशा जनावरांचा संपर्क जंगलात कळपाने चरण्यांसाठी येणाऱ्या आजूबाजूच्या खेड्यांतील गुरांशी झाल्याने त्यांच्यात रोगाचा प्रसार होतो.
- कित्येकदा वनातील अशी जनावरे व पशुपक्षी रोगवाहक असू शकतात. त्यांच्यामार्फत रोगाचा प्रसार होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
वराहांमधील लक्षणे
- वराह यांच्यात या आजाराचे लक्षणे दिसतात; पण डुकरात तोंडातील व जिभेवरील फोड आणि व्रणापेक्षा त्यांच्या नासिकाग्रावरील व खुरातील फोड व व्रण अधीक प्रकर्षाने दिसतात. तीव्र स्वरूपाच्या साथीत खुरही बाहेर येतात.
दुरूस्त झालेल्या गुरांवर होणारा परिणाम
- अशी गुरे अशक्य होतात. दुध देण्याचे प्रमाण घटते.
- त्यांच्या हृदयांची व फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते.
- अशी गुरे काम करताना धापा टाकू शकतात.
- वळूचे वीर्य निर्बिज होणे संभवते.
- गायी म्हशींमध्ये वंध्यत्व येते.
दुधात होते घट
या रोगात लागण प्रमाण बहुदा ६० ते ८० टक्के असते. परदशोतून आणलेल्या गुरांना जसे जर्सी, फिजीयन, रेडडेन, ब्राऊन स्विय जातीच्या जनावरांंना रोगाची लागण लवकर होते. अशा जनावरांत प्रसारही झपाट्याने होतो. मर्तूकही जास्त प्रमाणात आढळते. लाळखुरकुत या आजाराची लागण झालेल्या गाई, म्हशीचे दुध देण्याच्या प्रमाणात घट होते.
मृत्यूचे प्रमाण देशी कमी तर विदेशी जनावरात जादा
देशी गुरांत हे प्रमाण जवळ जवळ नसतेच;पण देशी वासरात ४ ते १२ महिन्याचे हे प्रमाण ५ ते ६ टक्के असते. तर जर्सी, फ्रिजीयन, रेडडेन आदी विदेशी जनावरात मुर्तुकीचे प्रमाणे ३० ते ४० टक्के असते. या आजाराने जिल्ह्यात ढोके वर काढले नसून प्रतिबंधात्क उपाय गरजेचे आहे.
आजाराची लक्षणे
- ताप येतो.
- खाणे-पिणे कमी किंवा बंद होते.
- तोंडात, जिभेवर, हिरड्यांवरील श्लेष्मल व खुरातील बेचक्यात फोड येतात. ते फुटून त्याचे व्रण बनतात.
- तोंडातून लाळ गळते व नाकातून स्त्राव वाहतो.
- जनावरे लंगडतात व कधी कधी तर संपूर्ण खूर बाहेर येतात.
- गाय-म्हशींच्या कासेवर कधी कधी फोड व व्रण होऊन स्तनदाह होतो. संसर्गामुळे कळपातील इतर गुरांना आजाराची लागण होते.
शेळ्या-मेंढ्यातील लक्षणे
- यातही गुरांतील बहुतेक लक्षणे दिसतातल. पण एकाच साथीत सर्वच लक्षणे दिसतील असे नाही. तोंडातील फोड व व्रण फार सुक्ष्म असून लक्षणाची तीव्रता फार कमी असते.

जनावरांवर करावयाचे उपचार

- तोंडातील व जिभेवरील फोड व पायाचे खुर यातील व्रण बरे होण्यांसाठी गुरांचे तोंड रोज दिवसातून दोन-तीन वेळा खाण्याच्या सोड्याच्या ४ टक्के पाण्याने किंवा तुरटीच्या एक ते दोन टक्के द्रावणाने अगर पोटॅशियम परमॅग्नेट १ टक्के द्रावणाने स्वच्छ धुवावेत. -
- हळद व तेल यांचे मिश्रण करून ते तोंडातील व्रणास लावावे किंवा बोरॅक्स व ग्लिसरीन मिसळून लावावे.
- घरगुती उपाय म्हणून कोथिंबीर वाटून त्यांचे चाटण तोंडातील व्रण कमी करण्यास उपयोगी पडते.
- बाजारात मिळणारी काही मलमे तोंडातील व्रणावर लावावीत. त्याचे व्रण बरे होण्यास मदत होते.
- ‘अ’ जीवनसत्व खाद्यातून द्यावे. किंवा ‘अ’ जीवनसत्वाचे इंजेक्शन टोचावे. हे औषध विदेशी व संकरीत वासरांना देणे फायद्याचे ठरते.
- पायांचे खुर रोज धुण्याच्या सोड्यांच्या ४ टक्के द्रावणाने धुवून काढावेत. किंवा गाय-बैलांच्या खुरातील जखमेवर डांबर लावावे. किंवा गव्हाच्या भुश्याचे पोटीस लावावे. सामुदायिक उपाय म्हणून जमिनीत १२० बाय १८० बाय २० से.मी. चा खड्डा खणून त्यात चुना पसरावा आणि त्यातून गुरे चालवावीत. गुरांना औषधीचे धुलीस्रान घडून जखमा बºया होतात. किंवा खड्ड्यांत चिखल करून त्यात दोन टक्के फिनाईलचे द्रावण करून टाकावे व त्यातून गुरे न्यावीत.
- रोगी गुरांना पातळ पेज किंवा कांजी रोज ३ ते ४ वेळा थोडे मीठ व गुळ घालून पाजावी.
- विदेशी पशुधनास मुळ रोगाबरोबर इतर जिवाणूंचा प्रादुर्भाव होऊन फुफ्फुस दाह वगैरे होऊ नये म्हणून प्रतिजैविकांची इजेक्शन्स डॉक्टरांकडून जनावरांना द्यावीत.

 

Web Title: 1.47 lakh animals vaccine scavengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.