१५ लाखांत १.५ दलघमी पाणी
By admin | Published: May 13, 2016 02:06 AM2016-05-13T02:06:44+5:302016-05-13T02:06:44+5:30
शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे.
शहरात पाणीटंचाई : पालिकेने घेतले पाणी विकत
हिंगणघाट : शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. यामुळे शहर वासियांची तहान भागविण्यासाठी नगर परिषदेने पाटबंधारे विभागाकडून १५ लाख रुपयांत १.५ द.ल.घ.मी. पाण्याची उचल केलेली आहे. हा पाणीसाठा आजंती बंधाऱ्यात उपलब्ध झालेला आहे. भविष्यात नागरिकांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार नसले तरीही नागरिकांनी जपून व काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. शहरात अनेक ठिकाणी बोअरींगची व्यवस्था आहे; परंतु उन्हाळ्यामध्ये बोअरींगचा वापर वाढल्यास बोअरींग बिघडण्याच्या तक्रारीतही सातत्याने वाढ होत आहे. त्याच्या दुरुस्तीकरिता नगर परिषदेने पथक तैनात करण्यात आले असून त्यांना तक्रारीची प्रथम दखल घेण्याचे निर्देश असल्याचे पालिकेकडून देण्यात आले आहे. टंचाईग्रस्त भागात पाण्याविना नागरिकांची भटकंती होवू नये म्हणून नगर पालिकेच्या वतीने दोन टँकरद्वारे सतत पाणी पुरवठा सुरू आहे. ज्या भागात पाण्याची टंचाई जाणवत असेल त्यांनी नगर परिषदेशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे. यातून पाण्याची समस्या सोडविण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याची बचत करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन अॅड. सुधीर कोठारी यांच्यासह न.प. उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, पाणीपुरवठा सभापती बादलसिंग रेवते, आरोग्य सभापती जितेंद्र कुकसे, महिला व बालकल्याण सभापती ज्योती मुडे, शिक्षण सभापती सोनाली सुटे, बांधकाम सभापती गीता मांडवकर, स्थायी समिती सदस्य प्रा. राजू अवचट, शंकर मोहमारे, अनिल भोंगाडे व सर्व नगर सेवकांच्या वतीने करण्यात आले आहे.(तालुका प्रतिनिधी)