१५ जण कृषी सेवकाच्या परीक्षेपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:22 AM2018-03-14T00:22:50+5:302018-03-14T00:22:50+5:30
कृषी सेवक पदाच्या भरती प्रक्रियेकरिता मंगळवारी भुगाव येथील ओम कॉलेज आॅफ इंजिनिअरींग या परीक्षा केंद्रात लेखी परीक्षा घेण्यात आली.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : कृषी सेवक पदाच्या भरती प्रक्रियेकरिता मंगळवारी भुगाव येथील ओम कॉलेज आॅफ इंजिनिअरींग या परीक्षा केंद्रात लेखी परीक्षा घेण्यात आली. यावेळी नावात बदल असल्याचे म्हणून तब्बल १५ तरुण-तरुणींना परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले.
कृषी सेवक पदाच्या परीक्षेसाठी उमेदवारांना परीक्षा केंद्रावर सकाळी ७.३० वाजता बोलविण्यात आले होते; पण प्रत्यक्ष परीक्षा ही सकाळी ९ वाजता घेण्यात येणार होती. या परीक्षा केंद्रावरून सुमारे २०० तरुण-तरुणींची परीक्षा दोन टप्प्यात घेण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. या केंद्रावर आलेल्या काही परीक्षार्थ्यांना तुम्ही वेळेच्या नंतर परीक्षा केंद्रावर पोहोचल्याचे कारण पुढे करीत तर काहींना तुमच्या नावात तफावत असल्याचे कारण काढून परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले. याची माहिती काहिंनी थेट जिल्ह्याधिकाºयांना दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही या प्रकरणी योग्य कार्यवाही करण्याची संबंधितांना सुचना दिली होती. या संदर्भात केंद्र प्रमुख यांना विचारणा केली असता परीक्षार्थ्यांच्या नावात बदल आणि वेळेत न पोहोचल्याने ही हा प्रकार घडल्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेकडेही पाठ
परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आलेल्या काही तरुणांनी घटनेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी सदर परीक्षा केंद्रातील केंद्र प्रमुखाने संपर्क साधून काही महत्त्वाच्या सूचना दिल्या; पण त्यांच्या सूचनांकडेही परीक्षा केंद्रातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप तरुण-तरुणींनी केला आहे.