मुख्यमंत्री दत्तक गावात १५ जणांचे मुंडण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:12 AM2018-03-22T00:12:23+5:302018-03-22T00:12:23+5:30
युवा परिवर्तन की आवाजच्यावतीने वर्धा येथून काढण्यात आलेली भू-देव यात्रा सेलू येथील मुक्कामानंतर बुधवारी केळझर येथे दाखल झाली.
ऑनलाईन लोकमत
केळझर : युवा परिवर्तन की आवाजच्यावतीने वर्धा येथून काढण्यात आलेली भू-देव यात्रा सेलू येथील मुक्कामानंतर बुधवारी केळझर येथे दाखल झाली. गावात यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यात्रेच्या दुसऱ्या दिवशीही शासनाने अतिक्रमण धारकांबाबत कुठलाही निर्णय न घेतल्याने केळझर येथील काही अतिक्रमण धारकांसह सुमारे १५ जणांनी सरकारच्या जनसामान्य विरोधी धोरणांच्या निषेधार्थ मुंडण करून यात्रेत सहभाग घेतला.
शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाºया कुटुंबीयांना नि:शुल्क जमिनीचे पट्टे देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. वर्धेच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या या यात्रेने मंगळवारी पवनार येथे काही वेळ विश्रांती घेतली. यानंतर मंगळवारी रात्री सेलू येथे मुक्काम केला. बुधवारी सकाळी ही यात्रा नागपूरच्या दिशेने निघाली. दुपारी केळझर येथे दाखल झालेल्या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. सावंगी (आसोला) येथे बुधवारी मुक्काम केल्यानंतर गुरूवारी ही यात्रा नागपूर येथे सायंकाळी उशीरा पोहोचणार आहे. शुक्रवार २३ मार्च रोजी ही यात्रा नागपूर येथील मुख्यमंत्री सचिवालयावर धडक देणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाºया कुटुंबीयांना नि:शुल्क जमिनीचे पट्टे द्यावे, यासाठी साकडे घालणार आहे. या पदयात्रेचे नेतृत्व युवा परितर्वन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, पलाश उमाटे करीत आहेत. या भू-देव यात्रेत वर्धा जिल्ह्यातील अतिक्रमणधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.