४८ तासात तब्बल १५ हजार शेतकऱ्यांनी केली केवायसी; गाव पातळीवरील विशेष शिबिरे ठरली उपयुक्त
By महेश सायखेडे | Published: September 5, 2022 06:48 PM2022-09-05T18:48:28+5:302022-09-05T18:49:01+5:30
सद्यस्थितीत वर्धा जिल्ह्याचा पीएम किसान केवायसीचा टक्का ६२ इतका झाला असल्याचे सांगण्यात आले.
वर्धा : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अर्थसहाय्य केले जाते. परंतु, संबंधित लाभार्थ्यांना केंद्राच्या या योजनेचा यापुढेही लाभ घेण्यासाठी वेळीच केवायसी करणे क्रमप्राप्त आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून पीएम किसान योजनेच्या केवायसीचा टक्का ५२ वर स्थिरावल्याने जिल्हा प्रशासनाच्या अडचणीत भर पडली होती.
जास्तीत जास्त लाभार्थ्यांना वेळीच केवायसी करता यावी, या हेतूने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत गेले दोन दिवस विशेष केवायसी शिबिर घेण्यात आले. याच शिबिरांमध्ये अवघ्या ४८ तासांच्या काळात जिल्ह्यातील तब्बल १५ हजार १८६ शेतकऱ्यांनी केवायसी करून घेतली. त्यामुळे हे विशेष शिबिर पीएम किसानच्या केवायसीचा टक्का वाढविण्यासाठी उपयुक्त ठरले आहे. सद्यस्थितीत वर्धा जिल्ह्याचा पीएम किसान केवायसीचा टक्का ६२ इतका झाला असल्याचे सांगण्यात आले.
७ सप्टेंबर, केवायसीची डेडलाइन
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करता यावी, या हेतूने शासनाने केवायसी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना ७ सप्टेंबरपर्यंत नजीकच्या ई-सेवा केंद्रात जाऊन तसेच घरबसल्या मोबाइलचा वापर करून केवायसी करता येणार आहे.
६,००० बंद होण्याची शक्यता
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून सहा हजारांचे अर्थसहाय्य केले जाते. परंतु, वेळीच केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या या अर्थसहाय्यापासून मुकावे लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने वेळीच केवायसी करणे गरजेचे आहे.
१,४६,३४३ लाभार्थी
जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे एकूण १ लाख ४६ हजार ३४३ लाभार्थी आहेत. त्यापैकी ९० हजार ८७० लाभार्थ्यांनी केवायसी केली आहे, तर ५५ हजार ४७३ लाभार्थ्यांनी अजूनही केवायसी केली नसल्याचे वास्तव आहे.
वर्धा तालुक्याचे काम ढेपाळलेलेच
मागील दोन दिवसात विशेष शिबिरांच्या माध्यमातून तब्बल १५ हजार १८६ शेतकऱ्यांनी पीएम किसानची केवायसी केली असली तरी वर्धा तालुक्यात पाहिजे तसे काम झाले नसल्याचे वास्तव आहे. गेल्या दोन दिवसात वर्धा तालुक्यात केवळ १ हजार ६१३ शेतकऱ्यांनीच केवायसी केली असून, इतर तालुक्यांच्या तुलनेत वर्धा तालुका हा पीएम किसान केवायसीच्या कामात मागेच आहे. वर्धा तालुक्यात आतापर्यंत केवळ ५१ टक्केच काम झाल्याचे वास्तव आहे.
केवायसी पूर्णची तालुकानिहाय स्थिती
आर्वी : ११,८८२
आष्टी : ७,१२८
देवळी : १२,७८४
हिंगणघाट : १४,२९५
कारंजा : १३,५५५
समुद्रपूर : ११,८७६
सेलू : ९,९६२
वर्धा : ९,३८८