सहा वर्षांत कर्करोगाचे १५८ बळी
By admin | Published: February 4, 2017 12:25 AM2017-02-04T00:25:38+5:302017-02-04T00:25:38+5:30
कर्करोग, औषधोपचार असला तरी जीवघेणा आजार. कर्करोग झालेल्या रुग्णाचा औषधोपचाराने आजार बरा होणे शक्य आहे.
जागतिक कर्करोग दिन : १०.५७ लाख नागरिकांची तपासणी
रूपेश खैरी वर्धा
कर्करोग, औषधोपचार असला तरी जीवघेणा आजार. कर्करोग झालेल्या रुग्णाचा औषधोपचाराने आजार बरा होणे शक्य आहे. हा औषधोपचार सर्वसामांन्यांच्या अवाक्यात यावा याकरिता शासनाच्यावतीने असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत झालेल्या तपासणीनुसार जिल्ह्यात गत सहा वर्षांत १५८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
सहावर्षांपासून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांतर्गत एकूण १० लाख ५७ हजार १९५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीअंती अतिसंवेदनशील असलेल्या तीन कॅन्सरसह एकूण २७७ रुग्णांना या आजाराची लागण झाली आहे. त्यापैकी ११९ जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शासनाच्या निर्देशानुसार तोंडाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, गर्भाषयाच्या कॅन्सरला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
जिल्ह्यात तपासणी झालेल्यांत मुखकॅन्सर असलेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे. याला सर्वात मोठे कारण तंबाखू चघळणे हा असल्याचे दिसून आले आहे. असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान तब्बल ८७ नागरिकांना या मुख कॅन्सर झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांची टक्केवारी ५१.७२ टक्के असल्याचे दिसून आले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर स्तनकॅन्सरचे रुग्ण आहेत. त्यांची संख्या असून तपासणीच्या तलनेत ही टक्केवारी ४५.४५ आहे. या दोन कॅन्सरवर उपचार करण्याकरिता शासनाच्यावतीने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याची अंमलबजावणी जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू आहे.