विदर्भातील दिडशेवर विद्यार्थी रशियात लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 02:14 PM2020-05-21T14:14:15+5:302020-05-21T14:16:08+5:30
शिक्षणाकरिता रशियात गेलेले विदर्भातील जवळपास १५७ विद्यार्थी सध्या मायदेशी येण्याकरिता धडपडत आहे. पण, त्यांना परत आणण्याकरिता कोणतीही सुविधा नाही. शासनाकडून वंदे भारत या मोहिमेअंतर्गत सहा विमाने विदेशात पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यातून रशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: शिक्षणाकरिता रशियात गेलेले विदर्भातील जवळपास १५७ विद्यार्थी सध्या मायदेशी येण्याकरिता धडपडत आहे. पण, त्यांना परत आणण्याकरिता कोणतीही सुविधा नाही. शासनाकडून वंदे भारत या मोहिमेअंतर्गत सहा विमाने विदेशात पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यातून रशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढली आहे.
रशियातील मॉस्को, कझान या ठिकाणी असलेल्या विविध विद्यापीठात विदर्भातील जवळपास १५७ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांची संख्या अधिक असून वध्यार्तील ३५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. काही पहिल्या वर्षाला तर काही व्दितीय, तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. सध्या कोरोनाने रशियामध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रशियात कोरोना रुग्णाची संख्या ३ लाखांच्या घरात असून देशातील दुसºया क्रमांकाची रुग्णसंख्या या देश आहे. त्यामुळे येथे शिक्षणाकरिता गेलेल्या विदर्भातील १५७ विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने वंदे भारत मोहिमेंतर्गत फक्त वयोवृद्ध व आजारी व्यक्तींना प्राधान्य देण्यात आल्याने विद्यार्थी दुर्लक्षित राहिले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही मायदेशी परत आणण्याकरिता तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी पालकवर्गाकडून केली जात आहे.
विदेश मंत्रालयाच्या भूमिकेकडे लक्ष
रशियामध्ये अडकलेल्या विदर्भातील १५७ विद्यार्थ्यांसह रायपूर येथील ५० विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याकरिता वर्ध्यातील भाजपाचे जिल्हा महामंत्री अविनाश देव व आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून प्रयत्न सुरु केले. ना. गडकरी यांनी लगेच पत्रव्यवहार करुन संपूर्ण विद्यार्थ्यांची यादी विदेश मंत्रालयाला पाठविली. या विद्यार्थ्यांकरिता मुंबई ऐवजी मॉस्को ते नागपूर असे विमान उपलब्ध करावे. त्या सर्वांना नागपुरातच विलगीकरणात ठेवण्यात येईल, असेही पत्रात नमूद केले आहे. आता विदेश मंत्रालयाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विमानांच्या तिकिटात तिप्पट वाढ
मॉस्को ते दिल्लीपर्यंतचे विमानाचे तिकिट १९ ते २० हजार रुपये होते. मात्र, आता आपत्तीकाळात शासनाने वंदे भारत मोहिमे अंतर्गत विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये मॉस्को ते दिल्लीपर्यंतचे तिकीट ५० हजार ४०० रुपये केल्याने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इतकी रक्कम देणे अडचणीचे ठरणार आहे. बहूतांश विद्यार्थी सर्वसामान्य परिवारातील असून शिष्यवृत्ती व शिक्षण कर्जाच्या भरवश्यावर विदेशात शिक्षण घेत आहे. या आपत्तीकाळात मॉस्को ते दिल्लीपर्यंतचे विमानाचे तिकीट, त्यानंतर दिल्ली ते नागपूरपर्यंतचे तिकीट आणि १४ दिवस क्वारंटाईनचा खर्च, विद्यार्थ्यांनाच करायचा असल्याने विद्यार्थ्यांसह पालकही आता विवंचनेत आहेत.
विदर्भातील दिडशेच्यावर विद्यार्थी रशियात अडकून पडले आहे. त्यांना आणण्याकरिता शासनाकडून अद्यापही उपाययोजना केली नाही. वर्ध्यार्तील जवळपास ३५ विद्यार्थी तेथे वैद्यकीय शिक्षणाकरिता गेले आहे. रशियामध्ये रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासोबत मॉस्को ते दिल्लीपर्यंतच्या विमानाच्या तिकीट दरामध्ये तिप्पट वाढ करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थी असल्याने त्यांना तिकीट दरात सवलत देण्यात यावी तसेच त्यांना मायदेशी आणण्याकरिता तत्काळ उपाययोजना करावी. कारण कोरोनाच्या प्रकोपामुळे सर्व पालकवर्ग चिंतेत आहे.
- किशोर फाले, पालक, वर्धा.