151 मृत कोविड बाधितांवर वर्धेत झालेत अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 05:00 AM2021-04-04T05:00:00+5:302021-04-04T05:00:11+5:30
शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून वर्धा शहरातील वैकुंठधामात मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. याच ठिकाणी जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील रहिवासी असलेल्या तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करून अंत्यसंस्कार केले जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मार्च महिन्यात तब्बल १५१ मृत कोविड बाधितांवर वर्धा येथील वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यापैकी ४९ व्यक्ती जिल्ह्याबाहेरील असून तशी नोंद वर्धा नगरपालिका प्रशासनाने घेतली आहे.
शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून वर्धा शहरातील वैकुंठधामात मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. याच ठिकाणी जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील रहिवासी असलेल्या तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करून अंत्यसंस्कार केले जात आहेत. मार्च महिन्यात या वैकुंठधामात तब्बल १५१ मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यापैकी ४९ व्यक्ती जिल्ह्याबाहेरील असल्याचे सांगण्यात आले. सध्या कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या ठिकाणची व्यवस्था सध्या तोकडी पडत आहे. भविष्यातील गरज लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने पर्यायी व्यवस्थाही उभी करणे गरजेचे आहे.
सूचना मिळताच स्मशानभूमितील कर्मचारी होतात ॲक्टिव्ह
आज किती मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करायचे आहेत याची माहिती सुरूवातीला स्मशानभूमितील कर्मचाऱ्यांना दिली जाते. ही माहिती मिळताच कर्मचारीही ॲक्टिव्ह मोडवर येत संपूर्ण तयारी करतात. शववाहिनीच्या सहाय्याने आणण्यात आलेले मृत कोविड बाधिताचे पार्थिव पीपीई किट परिधान केलेले व्यक्ती थेट रचलेल्या सरणावर ठेवतात. त्यानंतर त्या मृतदेहाला मुखाग्नी दिला जातो. जवळपास अशाच पद्धतीचा अवलंब करून काही मृत कोविड बाधितांवर दफनविधीही करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
आर्वी तालुक्यातील घटनेनंतर बदलली रणनीती
आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथे १० मे रोजी जिल्ह्यातील कोविडचा पहिला रुग्ण सापडला. या महिला कोविड बाधिताच्या अंत्यसंस्कारासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती. तर अंत्यविधी झाल्यानंतर या महिलेचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीवर वर्धा येथील वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.
एकाच वेळी नऊ मृतांना मुखाग्नीची व्यवस्था
वर्धा शहरातील इतवारा भागात असलेल्या वैकुंठधामात मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेगळी आणि विशिष्ट व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरात एकाच वेळी तब्बल नऊ मृत कोविड बाधितांना मुखाग्नी देण्याची व्यवस्था आहे.