१.५३ लाखांचा गांजा जप्त
By admin | Published: September 4, 2016 12:26 AM2016-09-04T00:26:55+5:302016-09-04T00:26:55+5:30
सेवाग्राम रेल्वेस्थानक परिसरात संशयीतरित्या बसून असलेल्या तिघांकडून १.५३ लाख रुपये किंमतीचा १५ किलो गांजा जप्त करण्यात आला.
तिघांना अटक : सेवाग्राम रेल्वे स्थानकावर कारवाई
वर्धा : सेवाग्राम रेल्वेस्थानक परिसरात संशयीतरित्या बसून असलेल्या तिघांकडून १.५३ लाख रुपये किंमतीचा १५ किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी सकाळी ११.१५ वाजता करण्यात आली. मुजफ्फर खान नियामत खान (३०) रा. हैदरपुरा इदगाह फाटा पठाण चौकसमोर अमरावती, आप्पाराव नुकूराजू गौड (४०) रा. चिन्नागडा, पो.स्टे. चिंतापल्ली, जि. विशाखापट्टनम आणि शेख आबीद शेख रज्जाक (२०) रा. जमील कॉलनी, अमरावती अशी आरोपींची नावे आहेत.
रेल्वे पोलिसांच्यावतीने नित्याप्रमाणे स्थानकावर तपासणी सुरू असताना फलाट क्रमांक तीनवर नागपूरकडे जाण्यासाठी तीन संशयीत इसम आढळून आले. त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना रेल्वे पोलीस चौकी सेवाग्राम येथे आणून तपासणी केली असता त्यांच्या पोटावर पांढऱ्या रंगाच्या कापडी पिशवीमध्ये काहीतरी बांधून असल्याचे दिसले. त्यांची अधिक चौकशी केली असता गांजा घेऊन जात असल्याची कबुली दिली. हा गांजा पांढऱ्या रंगाच्या चार ते पाच फुट लांब पिशवीमध्ये ठेवण्यात आला होता. ती पिशवी चापट करून तिघांनीही पोटाला गुंडाळली होती. ती पद्धतशीरपणे बांधून ते नागपूर येथे घेऊन जात होते. प्रत्येकाकडे सुमारे पाच किलो प्रमाणे तिघांकडून १५ किलो ३४१ ग्रॅम किंमत १ लाख ५३ हजार ७१० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रसंगी पंच व नायब तहसीलदार सी.जी. बर्वे यांच्या समक्ष पंचनामा करून आरोपींना अटक करण्यात आली.
ही कारवाई रेल्वे पोलीस निरीक्षक नालट, दिलीप बारंगे, श्याम धुर्वे, अशोक हनवंते, राहुल यावले तसेच सेवाग्राम येथील पोलीस उपनिरीक्षक जाटोलीया, उमेशसिंग, आर.के. भारती, सुभाष जुमळे, प्रमोद सांगळे, चौधरी, लोकेश राऊत, गणेश पवार, आकाश मेश्राम यांनी केली.(कार्यालय प्रतिनिधी)
एका फेरीसाठी चार हजार रुपये
रेल्वेच्या माध्यमातून गांजा बहुतांश भागात पोहोचविला जातो. यासाठी गरीब व थोडी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले युवक हेरले जातात. अमरावती येथील दोन्ही युवकांनी पहिल्यांदाच गांजा घेऊन जात असल्याची कबुली दिली. शिवाय किती रुपयांचा माल आहे, याबाबत माहिती नाही. आम्हाला संबंधित टोळीकडून प्रत्येक फेरीसाठी तीन ते चार हजार रुपये दिले जातात. शिवाय जेवण आणि अन्य खर्चही तेच करतात, असे सांगितले. यावरून गांजाची तस्करी करणारी मोठी टोळी असल्याचे निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.