154 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले, पुरात अडकलेल्या 15 लोकांची सुखरूप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 07:49 PM2018-07-07T19:49:16+5:302018-07-07T19:49:22+5:30
जिल्ह्यात काल 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे सेलू समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यात नदीनाल्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला
वर्धा :- जिल्ह्यात काल 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे सेलू समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यात नदीनाल्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला तर 154 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यात पुरात अडकलेल्या 15 लोकांची सुरक्षित सुटका करण्यात आली.
समुद्रपूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे मारडा, उमरी, गोविंदपूर, डोंगरगाव येथे पुलावरून पाणी वाहत आल्यामुळे या गावांचा संपर्क तुटला. तसेच वाघेडा नाल्याला पूर आल्यामुळे समुद्रपूर -वर्धा रस्ता बंद आहे. तसेच हिंगणघाट तालुक्यात किणगाव, पारडी, लाडकी, सोनेगाव(धोटे), दोंदुडा , येनोरा, बांबरडा, चिंचोली या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. तसेच सेलू तालुक्यात सिंदी रेल्वे या गावाचा संपर्क तुटला. गावात पाणी शिरल्यामुळे गावातील 50 लोकांना नेहरू विद्यालयात हलविण्यात आले. याशिवाय हमदापूर 16, दहेगाव 50 आणि सेलूमध्ये 77 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. नांद धरणाचे 6 गेट 25 सेमी उघडण्यात आले असून, 163. 75 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वडगाव धरणाचे 13 गेट उघडण्यात आले आहेत. वना नदीत 289.83 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.