१.५९ कोटींची नळयोजना शोभेची
By admin | Published: April 9, 2017 12:18 AM2017-04-09T00:18:52+5:302017-04-09T00:18:52+5:30
पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून २०१४ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत तळेगाव (टा.) गावाला १ कोटी ५९ लाख रुपये मंजूर झाले.
नागरिकांची तारांबळ : पाण्याकरिता होते भटकंती
वर्धा : पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून २०१४ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत तळेगाव (टा.) गावाला १ कोटी ५९ लाख रुपये मंजूर झाले. पैकी ८५ लाख रुपये खर्च करून विहीर खोदण्यात आली. टाकी उभारली; पण ग्रा.पं. प्रशासन व राजकीय उदासिनतेने ही योजना रखडल्याचे चित्र आहे. यामुळे दोन वर्षांपासून भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शाळकरी मुलांच्या हातात दप्तराऐवजी घागरी आल्या आहेत.
पाईपलाईन गावाच्या जवळ आणून ठेवली आहे. त्यानंतर समोर पाईपलाईन नेणे अद्याप सुरू केले नाही. सध्या हातपंपाद्वारे ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. यातही हातपंपाने उन्हाळ्याच्या प्रारंभीच तळ गाठल्याचे चित्र आहे. दोन वर्षे लोटत आहेत; पण ग्रा.पं. प्रशासन व राजकीय पुढारी ग्रामस्थांना पाणी देण्यास असमर्थ ठरत आहेत. सध्या १० ते १२ दिवसांनी ग्रामस्थांना पाणी मिळत आहे. याबाबत ग्रामस्थांनी ग्रा.पं. च्या संबंधित पदाधिकाऱ्यांना विचारणा केल्यास, लवकरच सुरू होईल, असे सांगितले जाते; पण हे वाक्य दोन वर्षांपासून गावकरी ऐकत आहेत. ग्रामीण पेयजल योजनेमार्फत २०१४ मध्ये १ कोटी ५९ लाख रुपये मंजूर झाले होते. पैकी ८४ लाख रुपये कंत्राटदारापर्यंत पोहोचले; पण पाणी मिळाले नाही. सध्या तळेगाव (टा.) येथील नागरिक हातपंपावर अवलंबून असून तो किती दिवस आधार देईल, ही चिंता ग्रामस्थांना त्रस्त करीत आहे. दोन वर्षापासूनचा दुर्लक्षितपणा यंदाही कायम राहण्याची शक्यता दिसून येत असल्याने दुष्काळाची दाहकता वाढण्याचे संकेत आहेत.(तालुका प्रतिनिधी)
तीन वर्षानंतरही नळांना पाणी नाही
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमार्फत तळेगाव (टा.) येथे तीन वर्षांपपूर्वी योजनेला मंजुरी देण्यात आली. सन २०१४ मध्ये १ कोटी ५९ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. याला तीन वर्षे लोटत असताना सुध्दा अद्याप नळ योजना सुरळीत नसल्याने पाण्यासाठी नागरिकांसह विद्यार्थ्यांना सुध्दा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.