१६७ गावांत पाणीटंचाई
By admin | Published: April 6, 2015 02:00 AM2015-04-06T02:00:24+5:302015-04-06T02:00:24+5:30
पारा ३९ - ४० अंशावर स्थिरावत आहे. वाढत्या तापमानामुळे जलस्त्रोत आटत असल्याने जिल्ह्यात बऱ्याच गावात पाणी टंचाई
जिल्हा प्रशासनाकडून २१५ उपाययोजना : तिसऱ्या टप्प्याकरिता ३ कोटी ३२ लाख रुपयांचा खर्च, तरीही झळा
रूपेश खैरी ल्ल वर्धा
पारा ३९ - ४० अंशावर स्थिरावत आहे. वाढत्या तापमानामुळे जलस्त्रोत आटत असल्याने जिल्ह्यात बऱ्याच गावात पाणी टंचाई जाणवत आहे. काही गावात पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात ही परिस्थिती असताना जिल्हा प्रशासन केवळ आराखडा तयार करून उपाय योजना सुरू असल्याचे सोंग आणत असल्याचे दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यानुसार एप्रिल-जून या तिसऱ्या टप्प्यात एकूण १६७ गावात पाणी टंचाई असल्याचे दर्शविण्यात आले आहे. या गावात पाणी पुरविण्याकरिता एकूण २१५ योजना अंमलात आणण्यात येत असल्याचे यात नमूद असून यावर ३ कोटी ३२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पाणी टंचाई निवारणार्थ एवढी रक्कम उपलब्ध असताना जिल्ह्यात नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
पाणी टंचाई निवारणार्थ तयार करण्यात आलेल्या आराखड्यात जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात एकाही गावात पाणी टंचाई नसल्याचे दर्शविण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात एकूण ७९ गावांत ९४ उपाययोजना करण्यात आल्या आहेत. टंचाई निवारणार्थ १ कोटी १८ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. असे असतानाही नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागत आहे. तिसऱ्या टप्प्यातील पाणी टंचाई निवारणार्थ कार्य सुरू करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात वर्धा व हिंगणघाट तालुक्यात सर्वाधिक गावात पाणीटंचाई असल्याचे आराखड्यातून दिसत आहे. असे असले तरी आष्टी तालुक्यातील मोई या गावात मागणी करूनही टँकर सुरू झाला नसल्याने त्यांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. ड्रमभर पाण्याकरिता शंभर रुपये मोजावे लागत आहे. हीच स्थिती तालुक्यातील तळेगाव (श्यामजीपंत) या गावातील काही भागात असल्याचे दिसून आले आहे.
१५ सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण
पाणी टंचाई असलेल्या गावातील नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे याकरिता एकूण १५ सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण करण्यात येणार आहे. यावर १५ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. तर ७० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार असून यावर १८.९० लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याचा आराखडा सांगत आहे.
तीन ठिकाणी होणार टँकरने पाणीपुरवठा
जिल्ह्यात काही भागातील पाणी टंचाई निवारण्याकरिता इतर उपाययोजना कुचकामी ठरत आहे. त्यावर मार्ग काढण्याकरिता टँकर सुविधा करण्यात येणार आहे. ही सुविधा तीन गावात प्रस्तावित आहे. याकरिता दोन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पाणी नसल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली असतानाही टँकर सुरू करण्यात आले नाही.
५६ ठिकाणी होणार नळ योजनेची दुरूस्ती
जिल्ह्यात पाणी पुरवठा करण्याकरिता नळ योजना कार्यान्वित आहे. मात्र काही ठिकाणी ती नादुरूस्त आहे. यात ५६ ठिकाणी ती दुरूस्त करण्यात येणार असल्याचे आरखड्यात नमूद आहे. यावर २२ लाख रुपयांचा खर्च होणार असल्याचे आराखड्यात नमूद आहे. यापैकी ९ ठिकाणचे काम प्रगतीपथावर असून ते तत्काळ करण्याच्या सूचना आहेत.
१५ ठिकाणी तात्पुरती पुरक पाणीपुरवठा योजना
पाणी टंचाई असलेल्या गावात तात्पूरती पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे आराखड्यात नमूद आहे. यात १५ गावांचा समावेश आहे. यावरील खर्च नळयोजनेच्या २२ लाख रुपयांत समाविष्ट आहे. यावर काम सुरू असून ही उपाययोजना लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे आराखड्यात नमूद आहे.