१६ व्या शतकातील किल्ल्याची झाली पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 05:00 AM2020-11-30T05:00:00+5:302020-11-30T05:00:17+5:30
इ.स. १६०० मध्ये पवन राजाने धाम नदीच्या काठावर किल्ल्याची निर्मिती केली. पुढे येथील लोकवस्तीला पवनार म्हणून ओळख मिळाली. पवन राजाने आपल्या राणीसह किल्ल्यावरून धाम नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची आख्यायिका आहे. पवन राज्याच्या काळात किल्ल्यासोबत चार प्रवेशद्वार बांधण्यात आले होते. ते चारही प्रवेशद्वार गाव सीमेवर होते. त्यापैकी तीन प्रवेश द्वार दुर्लक्षी धोरणामुळे जमीनदोस्त झाले आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
पवनार : पवन राजाच्या काळात वर्धा जिल्ह्यातील काही भागात काही वास्तू बांधण्यात आल्या. त्यापैकी एक पवनार येथील किल्ला आहे. या किल्ल्याची निर्मिती सोळाव्या शतकात करण्यात आली होती. पण सध्या त्याच्या देखभाल व दुरूस्तीकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या ऐतिहासीक धरोहराचे संगोपन करण्यासाठी शासन स्थरावर योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.
इ.स. १६०० मध्ये पवन राजाने धाम नदीच्या काठावर किल्ल्याची निर्मिती केली. पुढे येथील लोकवस्तीला पवनार म्हणून ओळख मिळाली. पवन राजाने आपल्या राणीसह किल्ल्यावरून धाम नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची आख्यायिका आहे. पवन राज्याच्या काळात किल्ल्यासोबत चार प्रवेशद्वार बांधण्यात आले होते. ते चारही प्रवेशद्वार गाव सीमेवर होते. त्यापैकी तीन प्रवेश द्वार दुर्लक्षी धोरणामुळे जमीनदोस्त झाले आहेत. तर एका प्रवेश द्वार अखेरची घटीका मोजत आहे. सध्या सेवाग्राम-पवनार विकास आराखड्याअंतर्गत विविध विकास कामे पवनार गावात करण्यात येत आहेत. पण पवन राजाच्या काळातील ऐतिहासीक वास्तूकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, हे विशेष.
आश्वासने विरली हवेत
किल्ल्याच्या डागडुजीसाठी अनेकदा लोकप्रतिनिधींनी विकास निधी देण्याचे आश्वासने दिले. पण लोकप्रतिनिधींनी आपले आश्वासन पाळले नाही.
१९५८ चे अधिनियम नुसार किल्ल्याला राष्ट्रीय स्मारक जाहीर करण्यात आले. १९ व्या शतकात तेथे हजरत सय्यद मोहम्मद कबीर यांचा दर्गाहची निर्मिती करण्यात आली. ते अनेकांचे श्रद्धास्थान आहे.
सध्या हे स्मारक पुरातत्व विभागाकडे असून सर्व जबाबदारी त्यांच्याकडे आहे.
निर्मितीनंतर एकदाही झाली नाही किल्ल्याची डागडुजी
पवनार येथील किल्ल्याची देखभाल तसेच दुरूस्तीची जबाबदारी पुरातत्व विभागाकडे आहे. पण या विभागाकडून एकदाही डागडुजी करण्यात आली नाही. किल्ल्याचा मागील भाग दिवसेंदिवस खचत असून चार पैकी तीन प्रवेशद्वार नामशेष झाले आहे. तर एक प्रवेशद्वार अखेरची घटीका मोजत आहे.
पवन राजाचा किल्ला हे पवनार गावाचे वैभव आहे. परंतु, आता तो पूर्णत: ढासळला आहे. शासनाच्या पुरातत्व विभागाचे याकडे लक्ष देवून गावाचे वैभव वाचविले पाहिजे. ग्रा. पं. ने अनेकदा पत्रव्यवहार केलेत.
- शालिनी आदमने, सरपंच, पवनार.
किल्ला परिसरातील प्राचिन विहिरीवरून राणी स्वत: पाणी भरायची. राज्याने दिलेल्या वचनानुसार अहमद कबीर बाबा यांना किल्ल्यावर आपली कबर बनविण्याची अनुमती दिली, असे सांगितल्या जाते.
- बब्बु शेख, दर्गाह, पुजारी, पवनार.