१७ महिन्यांत २ हजार ४३५ दारूविक्रेत्यांना अटक

By admin | Published: June 12, 2017 01:40 AM2017-06-12T01:40:31+5:302017-06-12T01:40:31+5:30

पोलिसांच्या वरदहस्तामुळे दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची ओरड आहे.

In 17 months, 2 thousand 435 liquor buyers arrested | १७ महिन्यांत २ हजार ४३५ दारूविक्रेत्यांना अटक

१७ महिन्यांत २ हजार ४३५ दारूविक्रेत्यांना अटक

Next

दोन नवीन ठाण्यांची कारवाई : दारूची २,६९९ गुन्हे दाखल, ५८७ पैकी केले ४७४ गुन्हे उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पोलिसांच्या वरदहस्तामुळे दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची ओरड आहे. असे असले तरी नवनिर्मित सावंगी (मेघे) व रामनगर ठाण्यातील पोलिसांनी दारूबंदीच्या कलमान्वये २ हजार ६९९ गुन्हे दाखल करीत २ हजार ४३५ दारूविक्रेत्यांना अटक केली आहे. शिवाय ५८७ गुन्ह्यांपैकी ४७४ गुन्हे उघड केले. ही कारवाईची आकडेवारी अवघ्या १७ महिन्यांची आहे, हे उल्लेखनिय!
शहरातील गुन्ह्यांचा चढता आलेख लक्षात घेऊन सेवाग्राम पोलीस ठाण्याचे विभाजन करून सावंगी (मेघे) तर शहर पोलीस ठाण्याचे विभाजन करून रामनगर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. १९ डिसेंबर २०१५ रोजी नवीन पोलीस ठाणे तयार झाले. तेव्हापासून सावंगीचे ठाणेदार म्हणून संतोष शेगावकर तर रामनगरचे ठाणेदार म्हणून विजय मगर जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तथा सहकाऱ्यांच्या मदतीने अवघ्या १७ महिन्यांत दारूबंदीच्या कलमान्वये २ हजार ६९९ गुन्हे दाखल केले आहेत. यातील २ हजार ४३५ दारूविक्रेत्यांना जेरबंदही करण्यात आले आहे.
सावंगी (मेघे) पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ४० गावांचा समावेश करण्यात आला आहे. यात ‘अ’ वर्ग गटातील ५, ‘ब’ चे १३ तर ‘क’ वर्ग गटातील २२ गावे आहेत. या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक गावात दारूबंदी महिला मंडळ कार्यरत आहे. या ठाण्याची निर्मिती झाल्यापासून मे २०१७ अखेरपर्यंत दारूबंदीच्या कलमान्वये १ हजार ४७८ गुन्हे दाखल करीत १ हजार २६१ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून दारूसाठ्यासह एकूण १ कोटी ८४ लाख ३७ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे चोरी, घरफोडी आदी स्वरूपांच्या दाखल झालेल्या २७३ गुन्ह्यांपैकी २४४ गुन्हे उघडकीस आणले असून १ हजार ७११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
रामनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सिंदी (मेघे) व पिपरी (मेघे) या गावांसह वर्धा शहराचा बहुतांश भाग येतो. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दारूबंदी महिला मंडळ कार्यरत आहेत. सदर पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्याच्या निर्मितीपासून मे २०१७ अखेरपर्यंत दारूबंदीच्या कलमान्वये १ हजार २१२ गुन्हे दाखल करीत १ हजार १७४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २१ लाख १५ हजार ८२० रुपयांच्या दारूसाठ्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे चोरी, घरफोडी आदी स्वरूपांच्या दाखल असलेल्या ३६० गुन्ह्यांपैकी २३० गुन्हे उघडकीस आणलेत. यात २४७ आरोपींनाही जेरबंद करण्यात आले आहे.

दोन्ही पोलीस ठाण्यात मनुष्यबळ अपुरेच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या सावंगी (मेघे) व रामनगर पोलीस ठाण्यात अपूरे मनुष्यबळ आहे. रामनगर ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, आठ अधिकारी व ११० कर्मचारी, अशी मंजूर पदे आहेत; पण येथे सध्या एक पोलीस निरीक्षक, दोन अधिकारी, ५९ कर्मचारी आणि चार चालक कार्यरत आहेत. सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात दोन पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक, ५६ कर्मचारी अशी पदे मंजूर आहेत; पण सद्यस्थितीत या ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक, ३९ कर्मचारी तसेच ३ चालक कार्यरत आहेत. दोन्ही पोलीस ठाण्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणखी प्रभावी कामकाजाची अपेक्षा असली तरी येथे पूरेसे मनुष्यबळ देणे गरजेचे आहे.

दोन वर्षांत १२ दारूविक्रेत्यांना शिक्षा
जिल्ह्यातील एकूण १९ पोलीस ठाण्यांत २०१६ व एप्रिल २०१७ अखेरपर्यंत दारूबंदीच्या कलमान्वये १६ हजार २६४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मागील दोन वर्षांत एकूण १२ दारूविक्रेत्यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
नुकतीच सावंगी पोलीस ठाण्यात दारूबंदीच्या कलमान्वये दाखल गुन्ह्यातील दारूविक्रेता आरोपी जयंत शंकर पाटील व शुभांगी जयंत पाटील, दोन्ही रा. तिगाव यांना तर रामनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी फिरोज खॉ पठाण, रा. जुनापाणी चौक पिपरी (मेघे) यांना न्यायालयाने विविध कलमान्वये सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

Web Title: In 17 months, 2 thousand 435 liquor buyers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.