जिल्ह्यातील १७ संघटना रस्त्यावर
By admin | Published: September 3, 2016 12:10 AM2016-09-03T00:10:42+5:302016-09-03T00:10:42+5:30
देशस्तरावरील कामगार कर्मचाऱ्यांच्या अस्वस्थतेची जाणीव शासनाला होण्याकरिता शुक्रवारी एकूण ११ केंद्रीय कामगार संघटना रस्त्यावर आल्या.
कामगार कायद्यातील बदलाचा विरोध : विविध मागण्या पूर्ण करण्यासंदर्भातही रेटा
वर्धा : देशस्तरावरील कामगार कर्मचाऱ्यांच्या अस्वस्थतेची जाणीव शासनाला होण्याकरिता शुक्रवारी एकूण ११ केंद्रीय कामगार संघटना रस्त्यावर आल्या. महागाई आणि बेरोजगारीला आळा घाला, कंत्राटीकरण, खासगीकरण रद्द करा, आयकर गणनेसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवा, वेतन पूनर्रचनेसाठी केंद्र शासनाने राज्यांना आर्थिक मदत द्यावी, कामगार कायद्यात कामगार विरोधी बदल रद्द करावा आदी मागण्यांकरिता वर्धा मात्र जिल्ह्यातील एकूण १७ कर्मचारी संघटना रस्त्यावर आल्या होत्या.
वर्धेतील ठाकरे मार्केट परिसरातील मैदानातून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी संघटना, राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, नर्सेस फेडरेशन, निमसरकारी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. जिल्ह्यातील सिटू, आकाशवाणी व दुरदर्शन, अ.भा. विमा कर्मचारी संघटना, पोस्टल कर्मचारी, दुरसंचार, विभाग कर्मचारी, अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन, घरेलू कामगार मोलकरीण संघटना इत्यादी कामगार संघटना संपात सहभागी झाल्या होत्या.
प्रारंभी सर्वप्रथम स्व. ठाकरे यांच्या पुतळ्यास जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एच.एम. लोखंडे यांनी माल्यार्पण केल्यानंतर मोर्चा बजाज पुतळा, शासकीय रुग्णालय, मुख्य पोस्ट आॅफीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. येथे न्यायालयाच्या द्वाराजवळ पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना अडविले. त्याठिकाणी मोर्चाचे रूपात सभेत करण्यात आले. येथे राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ओंकार धावडे यांच्या अध्यक्षतेत सभा घेण्यात आली. या सभेला एच.एम. लोखंडे यांनी मार्गदर्शन केले.
याशिवाय सभेला ग्रामसेवक संघटनेचे कुंदन वाघमारे, एमएसईबी वर्कस फेडरेशनचे गुणवंत डकरे, नर्सेस फेडरेशनच्या छाया देशपांडे, सिटूचे यशवंत झाडे, आयटकचे दिलीप उटाणे व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे विजय कोंबे व इतर संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. देशव्यापी संपात सरकारी व निमसरकारी आणि कामगार संघटना, मिळून अंदाजे ५ हजार कामगार कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला. त्यानंतर विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. मोर्चात अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.(प्रतिनिधी)
असंघटित कामगारांचा मोर्चा; बजाज चौक परिसरात कामांचा खोळंबा
केंद्र राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आयटक, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनच्यावतीने दयालनगर येथील रेल्वे स्थानकासमोरून मोर्चा काढला. या मोर्चामुळे बजाज चौक परिसरात काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
या मोर्चात आयटकचे राज्य सचीव दिलीप उटाणे, जिल्हाध्यक्ष मनोहर पचारे, सिद्धार्थ तेलतुंबडे, जिल्हाध्यक्ष नलिनी उबदेकर यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचताच त्यांना पंचायत समितीलगत रोखण्यात आले. यावेळी मोर्चात सहभागी महिलांना उटाणे यांनी मार्गदर्शन केले. या मोर्चात राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना सहभागी करण्याच्या मागण्यांसह विविध मागण्या करण्यात आल्या.