१७ वर्षीय तरुणीचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू; वर्ध्याच्या किन्हाळा येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 02:49 PM2022-06-04T14:49:50+5:302022-06-04T15:05:26+5:30
शेतात पोहोचल्यावर ती विहिरीतून पाणी काढत असताना पाय घसरून ती विहिरीत पडली.
समुद्रपूर (वर्धा) : पावसाळा तोंडावर असल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना गती दिली आहे. शेतीच्या या कामांत शेतकरी कुटुंबातील सर्वच राबत असून, शेतीच्या कामांत मदत करण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय तरुणीचा पाणी काढताना विहिरीत पडून मृत्यू झाला.
ही घटना तालुक्यातील किन्हाळा शिवारात शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. वैष्णवी गजानन डाखोरे असे मृत तरुणीचे नाव आहे. वैष्णवीच्या वडिलांनी शेतात जात असताना पिण्याचे पाणी घेऊन शेतात ये, असे वैष्णवीला सांगितले. पण ती शेतातच विहीर असल्याने विहिरीतील पाणी काढून ते वडिलांना देऊ, असा विचार करून वैष्णवी घरातील कामे आटोपून शेतात जाण्यासाठी घराबाहेर पडली. विशेष म्हणजे तिने पाण्यासाठी घागरही सोबत घेतली होती.
शेतात पोहोचल्यावर ती विहिरीतून पाणी काढत असताना पाय घसरून ती विहिरीत पडली. दरम्यान, तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी वैष्णवीचे वडील शेतातील विहिरीवर गेले असता त्यांना वैष्णवी विहिरीत मृतावस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. वैष्णवी ही संजय गांधी विद्यालय, परंडा येथे अकरावीचे शिक्षण घेत होती.