१२ वीच्या परीक्षेत १८ हजार विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:05 AM2019-02-11T00:05:48+5:302019-02-11T00:06:39+5:30
आयुष्याला कलाटणी देणारी बारावी परीक्षा आता दहा दिवसांवर आली असून कनिष्ठ महाविद्यालयात सध्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा अंतिम टप्प्यात आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थी अहोरात्र तयारी करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आयुष्याला कलाटणी देणारी बारावी परीक्षा आता दहा दिवसांवर आली असून कनिष्ठ महाविद्यालयात सध्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा अंतिम टप्प्यात आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थी अहोरात्र तयारी करीत आहेत. बारावीच्या परीक्षेचा हा महासंग्राम २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार असून जिल्ह्यातील १८ हजार ३६१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. २ फेब्रुवारीपासून सर्वच कनिष्ठ महाविद्यालयात प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा सुरु करण्यात आली. ही परीक्षा आता अंतिम टप्प्यात असून बारावीच्या अंतिम परीक्षेकरिता शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात परीक्षेचे वारे वाहू लागल्याने विद्यार्थ्यांसह पालकही व्यस्त दिसून येत आहेत. बारावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा मार्ग निवडला जातो. त्यामुळे अतिमहत्वाच्या असलेल्या या परीक्षेकरिता मागील दोन वर्षापासून विद्यार्थी आपापल्यापरिने प्रयत्नरत आहेत. २१ फेब्रुवारीपासून सुरु होणारा परीक्षेचा हा महासंग्राम २० मार्चपर्यंत चालणार आहे. त्यामुळे वर्ष-दोन वर्षातील मेहनतीचे फळ विद्यार्थ्यांना तीन तासातच मिळवायचे असल्याने, आता विद्यार्थी परीक्षा केंद्रातील तीन तासाच्याच खेळाचे गणित जुळवताना दिसून येत आहे. या तीन तासात जो यशस्वी झाला तोच परीक्षेवर आपली मोहर उमटविणार आहे.
परीक्षेकरिता पाल्यांसोबत पालकांचीही कसरत
पाल्य बारावीत असताना त्याच्या उत्तीर्ण होण्याची चिंता पालकांनाच जास्त असल्याने पालकही आपल्या पाल्याचा अभ्यास करुन घेण्यासाठी झटत आहे. पाल्य शाळेतून आला की शिकवणी वर्ग आणि त्यानंतर घरी अभ्यास यामुळे या दोन वर्षात ‘अभ्यास एके अभ्यास’ अशीच दिनचर्चा होऊन जाते. नातेवाईकांकडील कार्यक्रम, सोहळे, समारंभही पालक मुलांच्या परीक्षेमुळे वर्षभर टाळताना दिसतात. आता घोडामैदान जवळ असल्याने पालक मुलांच्या प्रकृतीची जास्त काळजी घेताना दिसून येत आहे. अभ्यासावर भर देण्यासोबतच प्रकृतीही ठणठणीत कशी राहील, यासाठी काही उपाययोजनाही सुरु आहे. म्हणजेच परीक्षेच्या महासंग्रामात पालक आपल्या पाल्याला एक योद्धा म्हणूनच तयार करतांना दिसत आहे.
बायोमॅट्रिक हजेरी केवळ देखावा
बारावी विज्ञान शाखेतील कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित न राहता शिकवणी वर्गातच वर्षभर राहून अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या दांडीबहाद्दरांना आळा घालण्यासाठी शासनाने बायोमॅट्रिक हजेरी सुरू केली होती. यामुळे विद्यार्थ्यांची महाविद्यालयात पूर्ण उपस्थिती राहणार, अशी अपेक्षा होती. परंतु, शिक्षण विभागाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे आणि खासगी महाविद्यालयाच्या दुकानदारीमुळे या उद्देशाला हरताळ फासल्या गेले.
आजही बायोमॅट्रिक यंत्रणा लागली; पण अंमलबजावणीअभावी शोभेच्या वस्तू ठरली आहे. त्यामुळे या परीक्षेत नियमित उपस्थित न राहणारे विद्यार्थीही परीक्षेला बसणार आहेत. परिणामी, नियमित उपस्थित राहणाºया विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.