१८ हजार विद्यार्थ्यांची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:20 AM2018-02-21T00:20:06+5:302018-02-21T00:20:28+5:30

शैक्षणिक जीवनात महत्त्वाची असलेल्या बारावीच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील १८ हजार ७८३ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार असून ४८ परीक्षा केंद्र सज्ज करण्यात आलेले आहेत.

 18 thousand students test | १८ हजार विद्यार्थ्यांची कसोटी

१८ हजार विद्यार्थ्यांची कसोटी

googlenewsNext
ठळक मुद्देबारावीची परीक्षा : ४८ केंद्र सज्ज; सहा भरारी पथके तैनात

ऑनलाईन लोकमत
वर्धा : शैक्षणिक जीवनात महत्त्वाची असलेल्या बारावीच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील १८ हजार ७८३ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार असून ४८ परीक्षा केंद्र सज्ज करण्यात आलेले आहेत. परीक्षेतील गैरप्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहा भरारी पथकही तैनात करण्यात आले आहे. यावर्षी नागपूर बोर्डाच्या बदलत्या नियमांचे पालन करीत विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
शैक्षणिक जीवनात दहावी आणि बारावीच्या परीक्षेला सर्वाधिक महत्त्व आहे. दहावीची परीक्षा विद्यार्थ्याचे कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी आदी क्षेत्र निश्चित करणारी तर बारावीची परीक्षा भविष्यातील उच्चशिक्षणात मिळणाऱ्या संधी प्राप्त करून घेण्यासाठी महत्त्वाची माणली जाते. नागपूर बोर्डाकडून बारावीची परीक्षा २१ फेबु्रवारी ते २० मार्च या कालावधीत घेतली जात आहे. यासाठी परीक्षा केंद्रही सज्ज करण्यात आले आहेत.
यावर्षी परीक्षा देताना विद्यार्थ्यांना बोर्डाच्या नवीन नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नसल्याच्या सूचना देण्यात आल्याने पालक व विद्यार्थ्यांची जबाबदारी वाढलेली आहे. यंदा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पेपरच्या अर्धा तास आधी पोहोचावे लागणार आहे. सकाळी ११ वाजता परीक्षा सुरू होणार असून त्यानंतर पाच मिनीटही उशीर झाला तर विद्यार्थ्याला परीक्षेला बसता येणार नाही. शिवाय पूर्वी तीन तासांच्या पूर्वी सर्व प्रश्नांची उत्तरे लिहून झाल्यास उत्तरपत्रिका देऊन बाहेर पडता येत होते; पण आता वेळेपूर्वी पेपर झाला असला तरी तीन तास आपल्या जागेवर बसून राहावे लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना यंदा वेळेचे काटेकोर पालन करीत परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
मागील वर्षीपर्यंत पेपर पोहोचविणे तथा उत्तरपत्रिका घेऊन जाण्याचे काम एकच व्यक्ती करीत होता; पण आता सहायक पर्यवेक्षक या पदाची निर्मिती करीत त्याच्यावर प्रश्नपत्रिका आणणे तथा उत्तरपत्रिका घेऊन जाणे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हा व्यक्ती दररोज बदलणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. शिवाय प्रश्नपत्रिका आता विद्यार्थ्यांसमोर परीक्षा खोलीतच उघडल्या जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. या सुधारणा करीत नागपूर बोर्डाने परीक्षेतील गैरप्रकार टाळण्याचे प्रयत्न चालविले आहेत.
पाच केंद्र संवेदनशील
जिल्ह्यात पाच परीक्षा केंद्र अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. यात लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय आष्टी, भारत कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट, विकास कला व वाणिज्य महाविद्यालय वडनेर ता. हिंगणघाट, विद्या विकास कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय समुद्रपूर तथा श्री गजाननप्रसाद कनिष्ठ महाविद्यालय गिरड ता. समुद्रपूर या केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांवर भरारी पथकांचे विशेष लक्ष राहणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
पथकांचा परीक्षा केंद्रांवर वॉच
बारावीच्या परीक्षेला २१ फेबु्रवारीपासून प्रारंभ होत आहे. या परीक्षेवर वॉच ठेवण्याकरिता जि.प. शिक्षण विभागाकडून सहा भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. यात शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), विशेष महिला भरारी पथक तथा उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचा समावेश आहे.

Web Title:  18 thousand students test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा