तलवारीने मारून १.८० लाख लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:20 PM2018-02-24T22:20:17+5:302018-02-24T22:20:17+5:30
गुरूकृपा कॉटन जिनिंगमध्ये भरदुपारी चार युवक हातात तलवारी फिरवीत रोखपालाच्या कक्षात शिरले.
ऑनलाईन लोकमत
समुद्रपूर : गुरूकृपा कॉटन जिनिंगमध्ये भरदुपारी चार युवक हातात तलवारी फिरवीत रोखपालाच्या कक्षात शिरले. त्याच्या पायावर तलवारीने वार करीत टेबलच्या कप्प्यातील १ लाख ८० हजार रुपये घेऊन बाहेर पडले. काट्याजवळ उभ्या असलेल्या एका कर्मचाºयाच्या हातावर वार केला व कारमधून पळून गेले. शनिवारी दुपारी १२.३० वाजता पडलेल्या थरारक सिनेस्टाईल दरोड्याने दहशत निर्माण झाली होती.
नागपूर-चंद्रपूर महामार्ग क्र. ७ वरील कानकाटी कांढळी येथे सौरभ अग्रवाल व विशाल वजानी यांच्या मालकीचा गुरूकृपा कॉटन जीन आहे. शनिवारी तेथे फार वर्दळ नव्हती. दोन मालवाहू आॅटो कापूस खाली करीत होते तर मजरा येथील शेतकरी भास्कर कोहचाडे हा रोखपालाच्या रूममध्ये ५ हजार रुपये अॅडव्हान्स घेत होता. यावेळी रोखपाल बलराम साहू (५८) व शेतकरी दोघेच तेथे होते. दुसºया बाजूने काटा असून तेथे आतमध्ये घनश्याम चांदेकर व महेश्वर फुलवानी होते. गणेश धाबर्डे हा बाहेर काट्यावर उभा होता. दरम्यान, कारमधून चौघे हातात तलवारी घेऊन आत आले. कार बाहेरच उभी होती. ते तलवारी फिरवीत थेट रोखपालाच्या कक्षाकडे गेले. तलवारीचे वार तेथील खुर्च्या तोडल्या. रोखपाल बलराम साहू याच्या हातावर वार करीत टेबलच्या कप्प्यात असलेले १ लाख ८० हजार रुपये कप्प्यासह घेतली. शेतकरी भास्कर कोहचाडे यांनी ५ हजार रुपये घेतले होते. त्याच्या गालावर तलवार लावत ती रक्कम हिसकावून घेतली.
यातील एक व्यक्ती तलवार घेऊन काट्याकडे गेला व गणेश धाबर्डेच्या पायावर वार केला. मापारी घनश्याम चांदेकर, महेश्वर फुलवानी यांना बाहेर न येण्याची ताकीद दिली. दरम्यान, कार आत आली व चौघांनीही तेथून पळ काढला. कारला समोर व मागे पिवळ्या रंगाची नंबर नसलेली प्लेट होती. तक्रारीनंतर ठाणेदार प्रवीण मुंडे उपराष्ट्रपतीच्या दौºयात बंदोबस्तात असल्याने पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लिगांडे, माधुरी गायकवाडसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. तपास पोलीस करीत आहेत. समुद्रपूर बाजार समितीचे सभापती हिंमत चतूर यांनी घटनास्थळाला भेट दिली.