जिल्ह्यातील 1.98 लाख व्यक्तींना मिळणार बूस्टर डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 05:00 AM2021-12-27T05:00:00+5:302021-12-27T05:00:26+5:30
विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात ७५ हून अधिक व्यक्ती परतले असले, तरी या सर्व व्यक्तींची आरटीपीसीआर कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. असे असले तरी विदेशवारी करून परतणाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. शिवाय विलगीकरण काळातील सातव्या दिवशी पुन्हा एकदा कोविड चाचणी केली जात आहे. जिल्ह्यात अद्याप ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नसला, तरी जिल्ह्यावर ओमायक्रॉनचे संकट कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशात ओमायक्रॉनचा प्रसार हळूहळू वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविडच्या ओमायक्रॉन या प्रकाराला ब्रेक लावण्याच्या उद्देशाने वयोवृद्ध व हेल्थ केअर वर्करला लसीचा बूस्टर डोस दिला जाणार असल्याची घोषणा केली. पंतप्रधानांच्या याच घोषणेमुळे आता जिल्ह्यातील १.९८ लाख वयोवृद्ध आणि हेल्थ केअर वर्करला कोविड लसीचा बूस्टर डोस दिला जाणार आहे. वयोवृद्धांना प्रिकॉशन डोस (क्षमता माता), तर हेल्थ केअर वर्करला बूस्टर डोस १० जानेवारीपासून दिला जाणार आहे.
विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात ७५ हून अधिक व्यक्ती परतले असले, तरी या सर्व व्यक्तींची आरटीपीसीआर कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. असे असले तरी विदेशवारी करून परतणाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. शिवाय विलगीकरण काळातील सातव्या दिवशी पुन्हा एकदा कोविड चाचणी केली जात आहे. जिल्ह्यात अद्याप ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नसला, तरी जिल्ह्यावर ओमायक्रॉनचे संकट कायम आहे. अशातच पंतप्रधानांनी केलेली घोषणा ही कोविडशी लढा देण्यासाठी फायद्याचीच ठरणारी आहे. नवीन लाभार्थ्यांना लस देण्यासाठीचे नियोजन केले जात आहे.
सहा महिन्यांचे अंतर, तर मिळणार बूस्टर डोस
- ज्या हेल्थ केअर वर्कर आणि वयोवृद्धांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तसेच लसीचा दुसरा डोस घेऊन सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला अशाच हेल्थ केअर वर्कर व वयाची साठी पार केलेल्या व्यक्तींनाच १० जानेवारीपासून कोविड लसीचा बूस्टर डोस दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
१.८० लाख वयोवृद्धांनी घेतला लसीचा पहिला डोस
- ६० पेक्षा जास्त वयोगटातील जिल्ह्यातील १ लाख ५३ हजार ५०० व्यक्तींना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले. असे असले तरी आतापर्यंत याच वयोगटातील १ लाख ८० हजार ९५७ व्यक्तींनी लसीचा पहिला, तर १ लाख २५ हजार ३८१ व्यक्तींनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
१५ ते १८ वयोगटातील ८० हजार व्यक्तींना मिळेल व्हॅक्सिन
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटांतील व्यक्तींनाही कोविडची प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे १५ ते १८ वयोगटांतील जिल्ह्यातील सुमारे ८० हजार व्यक्तींना कोविडची लस मिळणार आहे.
१७,८१८ हेल्थ केअर वर्करने घेतला लसीचा पहिला डोस
- जिल्ह्यातील १७ हजार ५४० हेल्थ केअर वर्करला कोविडची लस देण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले, तर आतापर्यंत १७ हजार ८१८हेल्थ केअर वर्करने लसीचा पहिला, तर १६ हजार ३४९ हेल्थ केअर वर्करने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.