कापड उद्योगाचा धागा उसवला; औद्योगिक नगरीमध्ये नव्या उद्योगांची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 11:59 AM2022-12-14T11:59:07+5:302022-12-14T12:03:17+5:30
हिंगणघाटमध्ये रोजगारावर टाच
भास्कर कलोडे
हिंगणघाट (वर्धा) : देशात स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असताना जिल्ह्यातील हिंगणघाट या औद्योगिक नगरीमध्ये आधुनिकतेचा आणि नवतंत्रज्ञानाचा अभाव दिसून येत आहे. शहरातील १२ हजार कामगारांना रोजगार देणारे इंग्रजकालीन दोन कापड मिल नियोजनशून्यतेमुळे आणि नव तंत्रज्ञानाअभावी बंद पडले आहेत. त्यामुळे कधीकाळी रोजगार देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात बेरोजगारी वाढताना दिसत आहे.
इंग्रजकालीन सीपी अॅण्ड बेरार म्हणजे हल्लीच्या मध्यप्रदेशची राजधानी नागपूर असताना कृषी मालावर आधारित अनेक प्रकिया उद्योगांमुळे नागपूरनंतर हिंगणघाट औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध होते. १८८१ मध्ये ३ लाख ५० हजारांची गुंतवणूक करून रायबहादूर बन्सीलाल अबिरचंद डागा यांनी सुरू केलेला आरबीबीए कापड मिल १९६३ मध्ये बंद पडला. तर १९०० मध्ये रायसाहेब रेखचंद मोहता यांनी १८ लाखांची गुंतवणूक करून उभारलेला आरएसआर मोहता कापड उद्योग २०२० मध्ये बंद पडला. शासनाच्या लोकाभिमुख योजनेची योग्य अंमलबजावणी न करणे आणि राजकीय इच्छाशक्तीचा असलेला अभाव, यामुळे जवळपास १२ हजार कामगारांना रोजगार देणारे हे दोन्ही कापड मिल तसेच अनेक जिनिंग प्रेसिंग युनिट बंद पडले आहेत.
शहर व परिसरात रस्ते, रेल्वे व वीज उपलब्ध आहे. शहरालगतच्या परिसरातून ४ मोठ्या नद्या वाहतात. तरीही या ठिकाणी मोठ्या उद्योगांचा अभाव असल्याने बेरोजगारी वाढत आहे. सिंचनाचा अभाव असून नागरिकांना एक दिवसाआड पाणी मिळते. शिक्षणाच्या बाबतीत हिंगणघाट उपविभाग मागासलेला आहे. विज्ञान व तंत्रज्ञान काळाची गरज असताना अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी किंवा तांत्रिक अभ्यासक्रम देणारे महाविद्यालय या परिसरात नाही. क्रीडा क्षेत्रातही तालुक्याने मैदान गाजविणारे खेळाडू दिलेत. मात्र तालुक्याला हक्काचे शासकीय क्रीडांगण मिळाले नाही.
औद्योगिक शहराला गतवैभव प्राप्त करून द्या!
राष्ट्रीय महामार्गालगत हे शहर असून आरोग्य सेवाही तोकडी आहे. आरोग्य विभागाने या तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात पुरेसा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. उपजिल्हा रुग्णालयाला श्रेणीवर्धित करून जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असली तरी अद्याप पूर्णत्वास आली नाही. मेट्रोचा विस्तार नागपूर लगतच्या जिल्ह्यात प्रस्तावित असला तरी हिंगणघाट-चंद्रपूर मार्गाकडे दुर्लक्ष आहे. या शहराला औद्योगिक गतवैभव प्राप्त करून देण्याची मागणी जोर धरत आहे.
एकमेव साखर कारखान्यालाही टाळे
तालुक्यातील रेल्वेमार्गाची लांबी १४ किलोमीटर असून ४० किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग तालुक्यातून जातो. तालुक्यात कापूस, सोयाबीन, गहू, तूर आणि ऊस आदी पारंपरिक पिके प्रामुख्याने घेतली जातात. एकेकाळी येथील हळद फार प्रसिद्ध होती, परिसरातील भौगोलिक परिस्थिती उद्योगांसाठी सकारात्मक असली तरी शेतमालावर प्रकिया उद्योगाची वानवा आहे. उपविभागातील एकमेव सहकारी साखर कारखाना अवघ्या काही वर्षातच ऊसाअभावी बंद पडला. तालुक्यात चार नद्या असूनही सिंचनाचा अनुशेष वाढतच चालला आहे.