वर्धा जिल्ह्यातील २ हजार ९५६ शिक्षकांच्या होणार तीन टप्प्यांत कोविड टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 02:27 PM2021-01-19T14:27:51+5:302021-01-19T14:28:19+5:30
Wardha News शालेय शिक्षण विभागाने आता २७ जानेवारी, २०२१ पासन पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील यंत्रणेने नियोजनास सुरुवात केली असून, गतीने कामे होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आठ ते नऊ महिने सर्वत्र कोरोनाने केलेल्या दमछाकीनंतर शासनाच्या आदेशानुसार २३ नोव्हेंबर, २०२० पासून नववी ते बारावीचे नियमित वर्ग सुरू झाले. त्याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने आता २७ जानेवारी, २०२१ पासन पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील यंत्रणेने नियोजनास सुरुवात केली असून, गतीने कामे होत आहे.
नववी ते बारावीचे प्रत्यक्षात अध्यापन सुरू झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जरी कमी असली, तरी शाळा कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून नियमित सुरू झालेली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी काळजी म्हणून सर्व वर्गखोल्या, शाळेच्या परिसरात जंतुनाशक फवारणीही करून घेण्यात आली होती.
त्याच पार्श्वभूमीवर नववी ते बारावी वर्गात शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांची त्या-त्या तालुकास्तरावर आरोग्य विभागामार्फत कोरोना तपासणी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, यासाठी पालकांकडून संमतीपत्र भरून घेण्यात आले होते, तसेच संस्थेची परवानगी शाळा सुरू करण्यासाठी घेण्यात आली होती. हीच सर्व प्रक्रिया आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग राबविणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या ७४ हजार ३०१
जिल्हातील शिक्षकांची संख्या २ हजार ९५६
तीन टप्प्यांत शिक्षकांची कोरोना ‘टेस्ट’
पाचवी ते आठव्या वर्गाला शिकविणारे खासगी आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची तीन टप्प्यांत कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यांत ३३ टक्के, दुसऱ्या टप्प्यांत ३३ टक्के आणि तिसऱ्या टप्प्यांत ३३ टक्के शिक्षकांची टेस्ट करण्यात येईल. ही चाचणी ८ तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येईल. याबाबत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची सभा तातडीने होणार आहे. त्यानंतर, निर्णय घेऊन २७ तारखेपर्यंत पाचवी ते आठवी वर्गाला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचणी संदर्भात नियोजन करण्यात येणार आहे.
पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे शासनाचे आणि शिक्षण विभागाचे आदेश आहे. त्यामुळे सर्वोतोपरी काळजी घेतली जाणार आहे. एकाच शाळेत एकाच दिवशी सर्व शिक्षकांची तपासणी होणार नाही. शाळेतील ३३ टक्के शिक्षकच कोरोना तपासणीला पाठवायचे आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांचे संमतीपत्र त्यांना घ्यावे लागणार आहे. आरोग्य विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची सभा झाल्यावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या जाणार आहे. तालुकास्तरावर खासगी, जि.प.च्या शाळा आणि शिक्षकांना निर्देश देऊन कोविड टेस्ट करण्याचे नियोजन करतील.
लिंबाजी सोनवणे
शिक्षणाधिकारी, (प्रा.) जि.प.वर्धा.