20 कोटींच्या रस्त्यावर दोन वर्षांतच लागणार ठिगळं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 05:00 AM2022-04-08T05:00:00+5:302022-04-08T05:00:26+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका आणि आर्वी नाका ते जुनापाणी चौक या तीन किलोमीटरच्या रस्त्याकरिता वीस कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या रस्त्याच्या कामाचे कंत्राट जे. पी. कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले होता. परंतु ही कन्स्ट्रक्शन कंपनी नावालाच असून प्रत्यक्ष काम मात्र वर्ध्यातील तिवारी नामक कंत्राटदाराने केले. सुरुवातीपासूनच या रस्त्याचे बांधकाम सदोष राहिल्याने वादग्रस्त ठरले. यासंदर्भात तक्रारी होऊन हा मुद्दा मंत्रालयापर्यंत पोहोचला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहराच्या विकासाकरिता तत्कालीन सरकारच्या काळात भरमसाट निधी उपलब्ध करून दिला. पण, प्राप्त झालेल्या निधीतून कंत्राटदाराने सदोष काम केल्यामुळे तब्बल वीस कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या शिवाजी चौक ते जुनापाणी चौकापर्यंत फोडकाम केले जाणार आहे. त्यामुळे या रस्त्यावर आता दोन वर्षातच ठिगळं लागलेली पाहावयास मिळणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका आणि आर्वी नाका ते जुनापाणी चौक या तीन किलोमीटरच्या रस्त्याकरिता वीस कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या रस्त्याच्या कामाचे कंत्राट जे. पी. कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले होता. परंतु ही कन्स्ट्रक्शन कंपनी नावालाच असून प्रत्यक्ष काम मात्र वर्ध्यातील तिवारी नामक कंत्राटदाराने केले. सुरुवातीपासूनच या रस्त्याचे बांधकाम सदोष राहिल्याने वादग्रस्त ठरले. यासंदर्भात तक्रारी होऊन हा मुद्दा मंत्रालयापर्यंत पोहोचला. रस्त्याच्या बांधकामातील सळाखी गायब असून प्राकलनानुसार काम केले नसल्याच्या तक्रारी असल्याने या रस्त्याच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
त्यामुळे आता या चौकशीकरिता हा तीन किलोमीटरचा रस्ता विविध ठिकाणी फोडला जाणार आहे. हा रस्ता फोडून सळाखी आहे किंवा नाही? प्राकलनानुसार काम झाले की नाही? याची तपासणी करून पुन्हा रस्ता तयार केला जाणार आहे. त्यामुळे या सिमेंटीकरणाच्या रस्त्यावर आता जागोजागी ठिगळ लागणार हे निश्चित झाले.
मार्गावर ४५ ते ५० ठिकाणी होणार फोडकाम
- शिवाजी चौक ते जुनापाणी चौकापर्यंतच्या या सिमेंटीकरण मार्गाची चौकशी करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.
- आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा तीन किलोमीटरचा मार्ग ४५ ते ५० ठिकाणी फोडून यामध्ये वापरलेल्या साहित्याची तपासणी करणार असल्याने सत्यता बाहेर येईल, यात शंका नाही.
- यापूर्वी त्रयस्त कंपनीकडून तपासणी केल्यानंतरच ही चौकशी आरंभल्याचे सांगितले जात आहे.
अभियंत्याचा पुत्रच होता पार्टनर?
- स्थानिक आमदारांच्या पाठपुराव्याने तत्कालीन अर्थमंत्र्यांनी शहराच्या विकासाकरिता कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला. याच निधीतून शिवाजी चौक ते जुनापाणी चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम करण्यात आले.
- कंत्राटदार कंपनीकडून वर्ध्यातील पेटी कंत्राटदाराने कंत्राट घेऊन हे काम पूर्णत्वास नेले. यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अभियंता यांचा पुत्रच पार्टनर असल्याने पेटी कंत्राटदारानेही तक्रारी मनावर घेतल्या नाही.
- विशेषत: बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.
पिपरीच्या सरपंचासह आमदारांच्याही तक्रारी
- तीन किलोमीटरच्या या मार्गाकरिता वीस कोटींचा निधी देण्यात आला, परंतु कंत्राटदाराने अधिकाऱ्यांना हाताशी धरून मनमर्जी काम केल्याने दोन ते अडीच वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ लोटला तरीही प्राकलनानुसार काम पूर्णत्वास गेले नाही. सदोष बांधकाम करीत असताना यामध्ये सळाखी वापरल्या नाहीत.
- मार्गाच्या दोन्ही बाजूने गट्टू लावलेले नसल्याने काम अपूर्णच आहे. या मार्गाबद्दल पिपरी ग्रामपंचायतच्या सरपंचासह आमदार व खासदारांनीही तक्रारी केल्या आहे. या सर्व तक्रारी मंत्रालयापर्यंत पोहोचल्याने या रस्त्याच्या कामाची चौकशी होणार असल्याची माहिती आहे.