जिल्ह्यातील २00 फॉगिंग मशीन नादुरुस्त
By admin | Published: May 8, 2014 02:08 AM2014-05-08T02:08:02+5:302014-05-08T02:08:02+5:30
डासांचा उपद्रव कमी होण्यासाठी मशीनद्वारे धुरळणीची खरेदी करण्यात आली होती; परंतु मशीनमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे त्या मशिनचा वापर होतांना दिसत नाही.
खरेदी व्यवहारावरच प्रश्नचिन्ह : दुरुस्तीचे प्रावधान नसल्याचे कारण पुढे
डासांचा उपद्रव कमी होण्यासाठी मशीनद्वारे धुरळणीची खरेदी करण्यात आली होती; परंतु मशीनमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे त्या मशिनचा वापर होतांना दिसत नाही. जिल्ह्यात एकूण २00 मशीन आल्या असून त्या नादुरूस्त असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या दुरूस्तीचे कुठलेही प्रावधान नसल्याचे समोर आले आहे. यामुळे नादुरूस्त असलेल्या मशीन धुळखात पडून आहे.
साचलेले सांडपाणी, तुंबलेली गटारे यामुळे डासांचा प्रादरुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच डेंग्यू, मलेरिया, टाईफाईडसारखे आजारही वाढू लागले आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी फॉगिंग मशीनचा लाभ होऊ शकला असता. जिल्ह्यातील जवळपास २00 ग्रा.पं.ने २८ हजार रुपये प्रती मशीन या दराने मशीन खरेदी केल्या आहेत. यासाठी लागणारा जवळपास ५६ लक्ष रुपयांचा निधी तेराव्या वित्त आयोगातून वापरण्यात आला आहे. परंतु मशिन नादुरस्त असल्यामुळे शासनाला ५६ लक्ष रुपयांचा चूना लागल्याचे निर्दशनात येते. मशीनची कुठलीही तपासणी न करता, आंधळेपणाने सदर मशिन खरेदी करण्यात आल्या. त्या मशीनची कार्यक्षमता न तपासता खरेदी करण्यात कुणाला लाभ तर मिळणार नव्हता, हे तपासणे आता गरजेचे आहे. एक दोन मशीन नादुरुस्त असेल तर समजण्यासारखे आहे, परंतु जिल्ह्यात खरेदी केलेल्या सर्वच मशीनची सारखी परिस्थिती असेल तर या खरेदी व्यवहारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
■ आरोग्य विभागामार्फत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. १३ व्या वित्त आयोगातून नियोजन करून ग्रा.पं.ने या फॉगिंग मशीनची खरेदी केली; परंतु त्यात सतत होत असलेल्या बिघाडामुळे व ती मशीन हाताळणारे कुशल कर्मचारी नसल्यामुळे त्या मशीन धूळखात आहेत. फॉगिंग मशीनचा वर्षभर वापर होत नसल्यामुळे ती तशीच राहते. तिचे व्यवस्थापन केल्यास बिघाड होणार नाही. परंतु ग्रामपंचायतस्तरावर मशीन हाताळणारे कुशल कारागिर नसल्याने हा बिघाड वारंवार होत आहे.
- हेमंत देवतळे
विस्तार अधिकारी, पं.स. वर्धा