२०० भिंती झाल्या बोलक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:58 PM2018-01-10T23:58:11+5:302018-01-10T23:58:22+5:30
शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने वर्धा नगर पालिका व बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी ‘आलेखन’ या भिंती चित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने वर्धा नगर पालिका व बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी ‘आलेखन’ या भिंती चित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकाच दिवशी शहरातील सुमारे २०० भिंतींवर एकापेक्षा एक चित्र रेखाटून त्या बोलक्या केल्या. सध्या या भिंती नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देत आहेत.
‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ या विषयावर आधारीत आलेखन या भिंती चित्र स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी सकाळी १० वाजता नगराध्यक्ष अतुल तराळे, न. प. उपाध्यक्ष प्रदिपसिंग ठाकुर, न. प. आरोग्य सभापती गुंजन मिसाळ, न. प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, माजी न. प. सभापती श्रेया देशमुख, नगरसेवक परवेझ खान, प्रदीप जग्यासी आदींच्या प्रमुख उपस्थितीत न. प. कार्यालय परिसरात झाले. याप्रसंगी नगराध्यक्ष अतुल तराळे, न. प. आरोग्य सभापती गुंजन मिसाळ व मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मान्यवरांनी स्वच्छतेचे महत्त्व विषद केले. त्यानंतर स्पर्धेत सहभागी झालेले विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी नियोजित ठिकाणी भिंतीवर चित्र रेखाटण्यासाठी रवाना झाले. बुधवारी सायंकाळी उशीरापर्यंत स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची संरक्षण भिंत, जिल्हाधिकाºयांच्या निवासस्थानाची संरक्षण भिंत, न. प. मुख्याधिकाºयांच्या निवास स्थानाची संरक्षण भिंत, जिल्हा मध्यवर्ती कारागृहाची संरक्षण भिंत, इतवारा भागातील शासकीय कर्मचाºयांच्या निवासस्थानाची संरक्षण भिंत यासह शहरातील शासकीय मालकीच्या भिंतींवर एकापेक्षा एक असे आकर्षक व स्वच्छतेचा संदेश देणारी चित्र रेखाटली. सदर स्पर्धेत शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील सुमारे ५०० विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी सहभागी झाले होते. यशस्वीतेकरिता न.प. आरोग्य विभागाचे प्रमुख बोरकर, अशोक ठाकुर, विशाल सोमवंशी, अशोक वाघ यांच्यासह न.प. अधिकारी व कर्मचाºयांनी सहकार्य केले.
५०० विद्यार्थ्यांचा सहभाग
अस्वच्छतेला शहरातून हद्दपार करण्यासाठी स्थानिक नगर पालिका व बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित आलेखन भिंती चित्र स्पर्धेत बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय, अग्रगामी विद्यालय, केसलीमल कन्या विद्यालय, भरत ज्ञान मंदिरम्, लोक विद्यालय, यशवंत महाविद्यालय, नवोदय विद्यालय सेलू आदी शाळा व महाविद्यालयातील सुमारे ५०० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
रंगाची व्यवस्था केलीय पालिकेने
स्वच्छ शहर, सुंदर शहर या विषयावर आधारित आलेखन या भिंती चित्र स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी लागणारा विविध रंग वर्धा नगर पालिकेच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आला होता.
सागरचे चित्र ठरले आकर्षणाचे केंद्र
सदर भिंती चित्र स्पर्धेत एकापेक्षा एक आकर्षक व समाजप्रबोधनात्मक चित्र विद्यार्थी, विद्यार्थिनींनी रेखाटली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सागर पिसुड्डे या विद्यार्थ्यांने खुद्द महात्मा गांधी हे भारत स्वच्छ करीत असल्याचे चित्र रेखाटले. सदर चित्र अनेकांना आपल्याकडे आकर्षीत करीत होते.
स्वच्छतेबाबत लोकचळवळ उभी होणे गरजेचे - तराळे
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या माध्यमातून अस्वच्छतेला शहराबाहेर करण्याचे काम सध्या पालिकेच्यावतीने सुरू आहे. यासाठी नागरिकांच्या सहकार्याचीही गरज आहे. स्वच्छ व सुंदर वर्धा शहरासाठी नागरिकांनी एकजुटीने पुढे येत स्वच्छ सर्वेक्षणाला लोकचळवळ, ती काळाची गरज आहे, असे आवाहन अतुल तराळे यांनी केले आहे.