आयटीआय टेकडीवर महाश्रमदानातून वृक्षारोपणाकरिता २००० खड्डे तयार
By admin | Published: June 5, 2017 01:04 AM2017-06-05T01:04:38+5:302017-06-05T01:04:38+5:30
म्हाडा कॉलनी जवळील आयटीआय टेकडी परिसरात महावृक्षारोपणाची आवश्यक पुर्वतयारी म्हणून निसर्ग सेवा समिती, ...
श्रमदानाकरिता एकवटले वर्धेकर : ३०० संवेदनशील व्यक्तींचा सहभाग; जिल्हाधिकाऱ्यांसह शिक्षक हजर
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : म्हाडा कॉलनी जवळील आयटीआय टेकडी परिसरात महावृक्षारोपणाची आवश्यक पुर्वतयारी म्हणून निसर्ग सेवा समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, उपवनसंरक्षक कार्यालयाच्या पुढाकाराने रविवारी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. याला वर्धेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सुमारे ३०० नागरिकांनी स्वत: फावडे, कुदळ आणून सहभाग दिला. सकाळी ६ वाजतापासून सुरू झालेल्या या महाश्रमदानातून २००० खड्डे खोदण्यात आले.
आजच्या महाश्रमदानात महिलांचा बहुसंख्येने सहभाग होता. श्रमदानात जिल्हाधिकारी शैलेश नवाल, खा. रामदास तडस यांनी स्वत: हातात कुदळ, फावडे घेवून खड्डे केले तर वर्धेचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार, तहसीलदार राऊत देखील सहभागी झाले. श्रमदानात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, वनविभागातील कर्मचारी, देखील संख्येने सहभागी झाले होते.
वर्धा शहराला हिरवेगार करण्यात वर्धेकरांचा हा उत्साह अधोरेखित करणारा ठरला. जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्व केलेल्या या महाश्रमदानातून तयार करण्यात आलेल्या खड्ड्यांत १ ते ७ जूले दरम्यान काळी माती भरुन, वृक्षारोपण करण्यात येणार आहे. याच परिसरात निसर्ग सेवा समितीद्वारे वर्ष २००० मध्ये ८०० वृक्षरोप लावून त्याचे संगोपण गत १७ वर्षांपासून सुरू आहे. या पुढेही सर्व श्रमदानकर्त्यांची एक प्रकाराने आमची जबाबदारी वाढविली असून पुढील वृक्षारोप लागवड व त्याचे संवर्धन योग्य पद्धतीने होईल असा विश्वास निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रसंगी निसर्ग सेवा समितीद्वारे निसर्ग संदेशचे प्रकाशन जिल्हाधिकारी नवाल, खा. तडस व उपवन संरक्षक दिगंबर पगार यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते आयटीआय टेकडीवर जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला १५ रोपटी लावण्यात आली. लावण्यात आलेली रोपटी वृक्षसंरक्षक अनिल पटेल, डॉ. राजेंद्र बोरकर, गोपी मते, डॉ. रंभा सोनाये, इमरान राही, निळकंठ पिसे यांनी दिली.
आजच्या महाश्रमदानात हिंदी विश्वविद्यालय, वर्धा बहार नेचर फाउंडेशन, आपले सरकार, आधारवड, श्रमीक पत्रकार संघ, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विद्यार्थी, वैद्यकीय जनजागृती मंच, जनहित मंच, सक्षम वर्धा, युवा सोशल फोरम, वर्धा सोशल फोरम, राष्ट्रसेवा दल वर्धा, उपअधीक्षक पोलीस विभाग निवृत्त पोलीस आॅफिसर्स, कर्मचारी वर्धा जिल्हा, विवेकानंद केंद्र, गुरुदेव सेवा मंडळ, निवृत्त अभियंता संघ, प्राथमिक शिक्षक समिती तसेच अधिकारी कर्मचारी व सामाजिक संघटनासह, संवेदनशील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.