१६२ शाळांमधून घेतले २१ हजार विद्यार्थ्यांनी शिक्षण
By admin | Published: May 15, 2017 12:42 AM2017-05-15T00:42:31+5:302017-05-15T00:42:31+5:30
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची भटकंती सुरू झाली आहे. चालू शैक्षणिक सत्रात पहिली ते बारावीमध्ये सेलू तालुक्यात
शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात : चालू सत्रात जि.प. शाळेत ५,२८८ विद्यार्थी
विजय माहुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची भटकंती सुरू झाली आहे. चालू शैक्षणिक सत्रात पहिली ते बारावीमध्ये सेलू तालुक्यात १६२ शाळांतून २१ हजार ४४९ विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. येत्या शैक्षणिक सत्रात यातील विद्यार्थी संख्या वाढावी म्हणून शिक्षकांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
सेलू तालुक्यात जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळांसोबतच अनुदानित, विनाअनुदानित खासगी संस्थांच्या शाळांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या १०९, नगर परिषदेच्या पाच, अनुदानित २३, अनधिकृत एक, समाज कल्याण विभागाच्या अनुदानित दोन तर विनाअनुदानित एक, कायम विनाअनुदानित सहा, स्वयंचलीत नऊ, विनाअनुदान तत्वावर दोन, अशा एकूण १६२ शाळा आहेत.
यात पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण देणाऱ्या १०५, पहिली ते आठवीपर्यंत ३०, पहिली ते बारावी चार, पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण देणारी एक, पाचवी ते सातवी १६, नववी व दहावी दोन, कनिष्ठ महाविद्यालय चार आहेत. यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचाही समावेश आहे.
शैक्षणिक सत्र संपले असून नवे सत्र सुरू होण्याच्या मार्गावर आहे. यात कुणी पहिल्या वर्गासाठी तर खासगी शिक्षण संस्था सहाव्या वर्गासाठी विद्यार्थी मिळावे म्हणून परिसर पिंजून काढत आहे. शिक्षक संभावित विद्यार्थ्यांच्या दारावर थाप मारताना दिसून येत आहेत. गावोगावी कॉन्व्हेंट असले तरी नर्सरी, केजी वन व टू चा समावेश आहे. पहिलीपासून शिक्षण देणारे कॉन्व्हेंट शहरी भागात आहेत.
जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये होत असलेला बदल पाहता गावातील विद्यार्थी गावातच चांगले शिक्षण घेऊन पुढील शैक्षणिक वाटचाल करतील, अशी अपेक्षा आहे. यासाठी शाळा डिजीटल होत आहेत. यामुळे जि.प. शाळांकडे पालकांचा कल वाढेल काय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जि.प. शाळांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तुलनेत विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध होत आहे. याचे महत्त्व शिक्षक पालकांना समजावून सांगत आहेत. गत काही वर्षांपासून जि.प. शाळेतील विद्यार्थी संख्या घसरत असल्याने आता शिक्षकही पालकांच्या संपर्कात दिसून येत आहेत. परिणामी, जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्या वाढल्यास गावातील हायस्कूलमधील विद्यार्थी संख्या कायम राहण्यास मदत होणार आहे.