२.१६ लाख शेतकरी आरक्षणाच्या बाजूने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 10:33 PM2018-04-04T22:33:53+5:302018-04-04T22:33:53+5:30
शेतकरी आरक्षण हा शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातून सुरु झाला. शेतकरी आरक्षणाबाबत मत जाणून घेण्यासाठी ‘डब्ल्यू. डब्ल्यू. डब्ल्यू. किसान आरक्षण डॉट कॉम’ हे संकेत स्थळ सुरू करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकरी आरक्षण हा शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातून सुरु झाला. शेतकरी आरक्षणाबाबत मत जाणून घेण्यासाठी ‘डब्ल्यू. डब्ल्यू. डब्ल्यू. किसान आरक्षण डॉट कॉम’ हे संकेत स्थळ सुरू करण्यात आले. त्यावर आतापर्यंत काही लोकप्रतिनिधींसह एकूण २ लाख १६ हजार ३१४ नागरिकांनी शेतकरी आरक्षणासंदर्भात संमती दर्शविली आहे. तर केवळ सहा जणांनी असंमती दर्शविली आहे, अशी माहिती शेतकरी आरक्षणचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी दिली आहे.
आपण देशापूढे शेतकरी आरक्षणाची संकल्पना मांडली आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि तेवढ्याच आत्मीयतेने मांडलेल्या शेतकरी आरक्षणाच्या विषयाला ठिकठिकाणी शेतकºयांनी स्वीकारले आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी व असंख्य ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत शेतकºयांच्या आरक्षणाचा ठराव घेतला असून सरकार मधील मंत्र्यांना प्रस्ताव देण्यात आला आहे. शिवसेनेचे उपनेते तथा माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी सर्वप्रथम या विषयाला आपले समर्थन दर्शविले होते. हा लढा सर्वत्र जोर धरत असतांना खुद्द देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी शेतकºयाना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी स्पष्टोक्ती केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही याविषयी आपण भेट घेऊन माहिती दिली. सर्वच पक्षातील नेत्यांनी शेतकरी हितार्थ या मुद्यावर एकत्रित येण्याची गरज असल्याची भावना असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
सेवाग्राम येथून सुरुझालेला शेतकरी आरक्षणाचा लढा महाराष्ट्रासह देशाच्या उत्तरेतील हरियाणापर्यंत जाऊन पोहचला आहे. हरियाणातील एका गावामध्ये गावकºयांनी ग्रामसभा घेऊन शेतकºयांना आरक्षण मिळाले पाहिजे असा ठराव ग्रामसभेत घेतला आहे. आरक्षण हा विषय देशाला नवीन नाही; पण आजवर जातीच्या आधारावर आरक्षण देण्यात आले असून शेतकरी आरक्षण या विषयी केंद्र व राज्य सरकारने शेतकरी हित लक्षात घेऊन तात्काळ योग्य निर्णय द्यावा, अशी मागणीही शैलेश अग्रवाल यांची आहे.