२,१७३ शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 11:34 PM2018-04-24T23:34:07+5:302018-04-24T23:34:07+5:30
तूर खरेदीवरील बंदी उठली असून ती सुरू करण्याच्या शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. यानुसार जिल्ह्यात मंगळवारपासून तूर खरेदी झाली आहे. या खरेदीमुळे आॅनलाईन नोंद करून बोलावणे येण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील तब्बल २,७७३ शेतकºयांच्या तूर खरेदीचा मार्ग मोकळा झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तूर खरेदीवरील बंदी उठली असून ती सुरू करण्याच्या शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. यानुसार जिल्ह्यात मंगळवारपासून तूर खरेदी झाली आहे. या खरेदीमुळे आॅनलाईन नोंद करून बोलावणे येण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील तब्बल २,७७३ शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा मार्ग मोकळा झाला.
वर्धा जिल्ह्यात नाफेडच्या सात आणि विदर्भ मार्केटींगच्या खरेदी केंद्रांवरून तूर खरेदी सुरू आहे. येत असलेल्या अडचणींवर मार्ग काढून शासनाच्यावतीने सुरू असलेली तूर खरेदी गोदामाचे कारण काढून १८ एप्रिल पासून बंद करण्यात आली. यामुळे या शेतकऱ्यांच्या तूर खरेदीवर संकट निर्माण झाले होते. परिणामी, अनेकांकडून तूर खरेदी सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. यावी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी खरेदीला मुदतवाढ दिल्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार खरेदीचे पत्र पणन महामंडळाला सोमवारी रात्री प्राप्त झाले. या पत्रानुसार जिल्ह्यातील सातही केंद्रांवर आजपासून पुन्हा खरेदी सुरू झाली आहे.
या खरेदीपूर्वी शासनाच्यावतीने जिल्ह्यात ५ हजार ६२७ शेतकऱ्यांकडून ६४ हजार ३३६ क्ंिवटल तूर खरेदी झाली. उर्वरीत शेतकºयांकडून तूर खरेदी करण्यात येणार आहे. ही खरेदी येत्या १५ मे पर्यंत सुरू राहणार आहे. या दिवसात उर्वरीत शेतकºयांची तूर खरेदी करण्याचे आव्हान या खरेदी यंत्रणेला पेलावे लागणार आहे.
जिल्ह्यात ७,८०० शेतकरी झाले आॅनलाईन
शासनाने शेतमालाची खरेदी आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय तुरीलाही लागू होत असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्या उत्पादनाची आॅनलाईन नोंदणी केली. जिल्ह्यात तब्बल ७ हजार ८०० शेतकरी आॅनलाईन झाले. यापैकी ५ हजार ६२७ शेतकऱ्यांकडून तूर खरेदी झाली तर उर्वरीत शेतकऱ्यांकडून अद्यापही तूर खरेदी होणे बाकी आहे.
१,२७३ क्ंिवटल चण्याची खरेदी
जिल्ह्यात तुरी सोबतच चणा खरेदीही सुरू आहे. नाफेडच्या सात पैकी तीन केंद्रांवरून चणा खरेदी सुरू आहे. आतापर्यंत या तीन केंद्रांवरून ८७ शेतकऱ्यांकडून १ हजार २७३ क्विंटल चण्याची खरेदी झाली आहे. तुरी प्रमाणे चणा खरेदीही आॅनलाईन झाल्याने तीन केंद्रांवरून आतापर्यंत ७३१ शेतकरी आॅनलाईन झाले आहे. या व्यतिरिक्त इतर केंद्रांवर नोंदणी सुरू आहे. इतर केंद्र लवकरच सुरू होणार असल्याचे पणन महामंडळाने सांगितले.