२२९ गावांना पाणी टंचाईची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:53 IST2018-02-05T23:53:23+5:302018-02-05T23:53:42+5:30
उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाई डोके वर काढते. दरवर्षी पाणी टंचाईवर मात करण्याकरिता कोट्यवधी रुपयांच्या उपाययोजना आखल्या जातात.

२२९ गावांना पाणी टंचाईची झळ
आॅनलाईन लोकमत
वर्धा : उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाई डोके वर काढते. दरवर्षी पाणी टंचाईवर मात करण्याकरिता कोट्यवधी रुपयांच्या उपाययोजना आखल्या जातात. परंतु यावर कायमस्वरूपी उपाययोजना आखल्या जात नाही. यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील २२९ गावांना पाणी टंचाईची झळ बसणार आहे. या गावांतील नागरिकांना दिलासा देण्याकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने ६ कोटी २ लाख रुपयांचा आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे.
गत उन्हाळ्याच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई असलेली गावे कमी असल्याचे मंजुर आराखड्यावरून दिसत आहे. गत उन्हाळ्यात २८६ गावात पाणीटंचाई जाणवल्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. या गावातील पाणी टंचाई निवारण्याकरिता ४७८ उपाययोजनांवर ७ कोटी ९८ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. ऐवढी रक्कम खर्च होवूनही यंदा २२९ गावांना पाणी टंचाईची झळ बसणार असल्याचे दिसत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवणाºया गावात ३९१ उपाययोजना आखण्यात आल्या आहे.
करण्यात येणाºया उपाययोजना
पाणी टंचाई निवारण्याकरिता टंचाईग्रस्त गावात ४६ विहिरीचे खोलीकरण तर १२९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. १२४ नळयोजनांची दुरुस्ती करण्यात येणार असून तात्पूरती पुरक योजना म्हणून एक योजना मंजूर करण्यात आली आहे. सध्या टंचाई असलेल्या गावात सात उपाययोजनांची दुरुस्ती प्रगतीपथावर आहे. या उपाययोजना तीन महिन्याकरिता असल्याचे सांगण्यात आले आहे.
१५ जलाशयात ४१.३८ टक्के जलसाठा
वर्धा जिल्ह्यात मोठे आणि मध्यम असे मिळून १५ जलाशय आहेत. या जलाशयातून शेतीच्या सिंचनासह व्यवसाय, उद्योग व नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरविले जाते. सध्या या जलाशयात पाण्याची स्थिती ठिकठाक असली तरी उन्हाळ्याच्या दिवसात झपाट्याने घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या या जलाशयात ४१.३८ टक्के उपयुक्त जलसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
अत्यल्प पावसामुळे स्थिती बिकट
जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे जलसाठे पूर्णत: भरले नाही. परिणामी हिवाळ्याच्या अखेरीसच पाण्याची पातळी निम्यापेक्षा कमी आहे. यातच यंदाच्या उन्हाळ्यात सूर्य आग ओकणार असल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तविले आहे. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात या जलसाठ्यात पाणी राहील अथवा नाही याबाबत साशंकता आहे.