२२ उमेदवारांची दांडी तर १,३५८ उमेदवारांनी दिली कोतवाल होण्यासाठी परीक्षा
By महेश सायखेडे | Published: May 23, 2023 04:40 PM2023-05-23T16:40:27+5:302023-05-23T16:41:32+5:30
पाच उपकेंद्रांवरून झाली शांततेत परीक्षा
वर्धा : जिल्ह्यातील कोतवालांच्या ८९ पदांसाठी मंगळवारी वर्धा शहरातील पाच उपकेंद्रांवरून प्रत्यक्ष लेखी परीक्षा घेण्यात आली. या पाचही उपकेंद्रांवर शांततेत कोतवाल पदभरतीची परीक्षा पार पडली असून संबंधित परीक्षेला २२ उमेदवारांची अनुपस्थिती होती. तर १ हजार ३८० उमेदवारांपैकी तब्बल १ हजार ३५८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील कोतवाल पदभरती प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असलेली परीक्षा ही ‘एमपीएससी’च्या धर्तीवर आणि पारदर्शीच व्हावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने प्रभावी नियोजन केले होते. मंगळवारी दुपारी १२ ते १ या वेळेत यशवंत महाविद्यालय वर्धा, न्यू इंग्लिश हायस्कूल वर्धा, न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज वर्धा, जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय वर्धा आणि गो. से. वाणिज्य महाविद्यालय वर्धा या उपकेंद्रावरील एकूण ६४ खोल्यांतून ही परीक्षा शांततेत पार पडली. संबंधित परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाचही परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त होता. शिवाय पाच परीक्षा केंद्रांवर प्रत्येकी एक असे पाच उपकेंद्रप्रमुख, २१ पर्यवेक्षक व अतिरिक्त पर्यवेक्षक, ६३ समवेक्षक व अतिरिक्त समवेक्षक, १० लिपिक, १५ शिपाई, आठ वाहनचालक आणि १० पोलिस कर्मचाऱ्यांनी सेवा दिली.
पॉईंटकुठल्या केंद्रावरून किती उमेदवारांनी दिली परीक्षा
* यशवंत महाविद्यालय, वर्धा : २६०
* न्यू इंग्लिश हायस्कूल, वर्धा : ४२३
* न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज, वर्धा : २३६
* जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय, वर्धा : ३५६
* गो. से. वाणिज्य महाविद्यालय, वर्धा : ८३
कुठल्या केंद्रावरील किती उमेदवारांनी परीक्षेला दाखविली पाठ
* यशवंत महाविद्यालय, वर्धा : ०४
* न्यू इंग्लिश हायस्कूल, वर्धा : ०९
* न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज, वर्धा : ०४
* जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय, वर्धा : ०४
* गो. से. वाणिज्य महाविद्यालय, वर्धा : ०१
२४ तासांच्या आत तपासल्या उत्तरपत्रिका
मंगळवारी पाच परीक्षा उपकेंद्रांवरून कोतवाल पदभरती प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असलेली परीक्षा घेण्यात आली. दुपारी १२ ते १ या वेळेत ही परीक्षा झाली असली तरी त्यानंतर लगेच उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी जिल्हा कचेरीत करण्यात आली. संबंधित परीक्षेचा निकाल मंगळवारीच जाहीर करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाचा असला तरी वृत्तलिहिस्तोवर म्हणजेच दुपारी ४.१७ वाजेपर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर झाला नव्हता.