जीवनदायीचा २२ हजार रुग्णांना लाभ
By Admin | Published: September 22, 2016 01:09 AM2016-09-22T01:09:23+5:302016-09-22T01:09:23+5:30
गोरगरीब रुग्णांना वरदान ठरलेली राजीव गांधी जीवनदायी योजना जिल्ह्यात चार रुग्णालयात राबविली जाते.
चार रुग्णालयांचा समावेश : ५१.८५ कोटींचा दिला निधी
गौरव देशमुख वर्धा
गोरगरीब रुग्णांना वरदान ठरलेली राजीव गांधी जीवनदायी योजना जिल्ह्यात चार रुग्णालयात राबविली जाते. या योजनेत आजपर्यंत २२ हजार ४३७ जणांवर उपचार करण्यात आलेत. यात ९७१ शस्त्रक्रियांचा समावेश आहे. ‘कॅशलेस’ सुविधेमुळे रुग्ण व त्यांच्या नातलगांना आधार मिळत आहे.
२०१२ पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आठ जिल्ह्यांत लागू करण्यात आली. यात वर्धा जिल्ह्याचा समावेश नव्हता. सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात ती राबविली जात होती. नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना कार्यान्वित झाली. जिल्हा सामान्य रुगणालय, आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी, डॉ. राणे रुग्णालय आर्वी व कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम या ४ रुग्णालयांत दरवर्षी योजनेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या योजनेत अस्थिरोग व हृदयविकाराच्या आजारावर शस्त्रक्रिया रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. यानंतर अॅपेंडिक्स, किडणी स्टोन, ब्रेस्ट कॅन्सर, किडणी ट्रान्सफर, लहान बालकांचे विविध आजार, हर्निया आदीवर शस्त्रक्रिया झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
वर्धा जिल्ह्यातील ४ रुग्णालयांत आॅगस्टपर्यंत २८ हजार ४३७ जणांनी योजनेचा लाभ घेतला. यात चार रुगणालयांना ५१ कोटी ८५ लाख ५२ हजार १८९ रुपये प्राप्त झाले आहेत. अद्याप १ कोटी ९४ लाख ४८ हजार ५०० रुपये शासनाकडे शिल्लक आहेत. रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देणे, साधन सामग्री खरेदी करणे यावर प्रशासनाकडून खर्च करण्यात येत आहे. अधिक खर्चाचा भार शासनाकडून उचलला जातो. शिवाय रुग्णांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे सामान्य रुग्णांना याचा मोठा दिलासा मिळत आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेमुळे रुग्ण व त्यांच्या नातलगांना पैशाची जुळवाजुळव करण्यात वेळ घालवावा लागत नसल्याने समाधान व्यक्त होताना दिसते.