आजाराने जर्जर 2,200 व्यक्तींना मिळणार घरपाेच कोविड व्हॅक्सिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 05:00 AM2021-07-25T05:00:00+5:302021-07-25T05:00:12+5:30
शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यातील आठही तालुक्यांत विविध आजारांमुळे साधे लसीकरण केंद्रांपर्यंतही न जाऊ शकत असलेल्या व्यक्तींची माहिती आरोग्य विभागाने गोळा केली. माहिती गोळा करताना हिंगणघाट तालुक्यात ४५०, सेलू २०५, आर्वी ८७, आष्टी १४६, वर्धा ७०८, देवळी १८४, समुद्रपूर २२५ तर कारंजा तालुक्यात २०० लाभार्थींना घरपोच लस द्यावी लागेल, असे निदर्शनास आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विविध आजारांनी जर्जर झाल्यामुळे साधे लसीकरण केंद्रांवरही जाता येत नसलेल्या व्यक्तींना घरपोच कोविडची व्हॅक्सिन देण्याचे शासनाने निश्चित केले आहे. त्यासाठीची संपूर्ण तयारी जिल्हा आरोग्य विभागाने पूर्ण केली असून, लससाठ्याची मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली आहे. लससाठा उपलब्ध होताच, जिल्ह्यात आजारांनी जर्जर झालेल्या २,२०० व्यक्तींना घरपोच लस दिली जाणार आहे. शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यातील आठही तालुक्यांत विविध आजारांमुळे साधे लसीकरण केंद्रांपर्यंतही न जाऊ शकत असलेल्या व्यक्तींची माहिती आरोग्य विभागाने गोळा केली. माहिती गोळा करताना हिंगणघाट तालुक्यात ४५०, सेलू २०५, आर्वी ८७, आष्टी १४६, वर्धा ७०८, देवळी १८४, समुद्रपूर २२५ तर कारंजा तालुक्यात २०० लाभार्थींना घरपोच लस द्यावी लागेल, असे निदर्शनास आले आहे.
मला लस कधी मिळणार?
अर्धांगवायूच्या झटक्यामुळे मी सध्या घरी खाटेवरच आहे. साधे लसीकरण केंद्रावर जाऊन कोविडची लस घेऊ शकत नाही. शासनाचे धोरण उत्तम असून, लवकर त्यावर कृती व्हायला पाहिजे. आपण घरपोच मिळणारी कोविडची व्हॅक्सिन नक्कीच घेऊ.
- कल्पना तेलंग, कृष्णनगर, वर्धा.
शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून घरपोच किती लाभार्थ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस द्यावी लागेल, याची माहिती गोळा करण्यात आली. जिल्ह्यात २ हजार २०० व्यक्तींना घरपोच लस द्यावी लागणार आहे. तशी माहिती वरिष्ठांना सादर करण्यात आली आहे. सूचना मिळताच, प्रत्यक्ष लसीकरण सुरू करण्यात येईल.
- डॉ. प्रभाकर नाईक, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, वर्धा.
हायरिस्कमध्ये कोण?
- विविध आजारांमुळे जर्जर झालेल्या, तसेच साधे लसीकरण केंद्रापर्यंतही जाता येत नसलेल्या व्यक्तींना शासनाच्या या धोरणानुसार हायरिस्कमध्ये समाविष्ट करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
घेतली जातेय अधिकची माहिती
- घरपोच २ हजार २०० लाभार्थ्यांना कोविडची लस देण्याचे निश्चित करण्यात आले असले तरी जिल्ह्यात नमक्या किती लाभार्थ्यांना घरपोच लस द्यावी लागेल याची अधिकची माहिती नव्याने गोळा केली जात आहे.