१० महिन्यात २२४ नवजात बालकांचा मृत्यू
By admin | Published: March 25, 2017 12:48 AM2017-03-25T00:48:41+5:302017-03-25T00:48:41+5:30
नवजात बालकांचा मृत्यू रोखण्याकरिता शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने अनेक योजना राबविल्या जातात.
प्रमाण होतेय कमी : १६,१४९ प्रसुतींची नोंद
रूपेश खैरी वर्धा
नवजात बालकांचा मृत्यू रोखण्याकरिता शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने अनेक योजना राबविल्या जातात. हे मृत्यू रोखण्यात या योजना तोकड्या पडत असल्याचे नोंदीवरून दिसत असले तरी वर्धेतील स्थिती तशी नसल्याचे दिसते. वर्धेत गत १० महिन्यात तब्बल २२४ नवजात बालकांच्या मृत्यूची नोंद झाली. शून्य ते एक वर्षे वयोगटातील बालकांची झालेली यंदाची नोंद ही गत चार वर्षांच्या तुलनेत कमी आहे. यामुळे नवजात बालकांचा मृत्यू रोखण्यात जिल्हा आघाडी घेत असल्याचे दिसते.
प्रसूतीदरम्यान आलेल्या अडचणी आणि वेळेवर मिळत नसलेल्या उपचाराअभावी नवजात बालकांचा मृत्यू होतो, असे संशोधनातून समोर आले. या प्रकारावर आळा बसविण्याकरिता शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून विविध योजना राबविल्या जात आहे. राज्यात त्या अपयशी ठरत असल्या तरी वर्धेत त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. गत चार वर्षांत नवजात अर्भकांचे झालेले मृत्यू आणि सुरू वर्षातील नोंद विचारात घेता नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे.
वर्धा जिल्ह्यात गत १० महिन्यात १६ हजार १४९ प्रसूती झाल्या आहेत. त्यापैकी २२४ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्ह्याच्या आरोग्य विभागात आहे. शासनाच्या सुचनेनुसार राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात हा दर शून्य असणे अपेक्षित आहे. वर्धेत त्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे दिसते.