मित्राचा वाढदिवस ‘सेलिब्रेट’ करणे भोवले; २३ वर्षीय तरुणाला चाकूने भोसकले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 06:28 PM2022-06-06T18:28:01+5:302022-06-06T19:06:56+5:30

याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी पाच आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेतले असून इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, मुख्य आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

23-year-old man stabbed to death while returning home on bike after celebrating a friend's birthday | मित्राचा वाढदिवस ‘सेलिब्रेट’ करणे भोवले; २३ वर्षीय तरुणाला चाकूने भोसकले !

मित्राचा वाढदिवस ‘सेलिब्रेट’ करणे भोवले; २३ वर्षीय तरुणाला चाकूने भोसकले !

Next
ठळक मुद्देजुन्या आरटीओ मैदानालगत मध्यरात्रीचा थरार : आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : मित्राचा वाढदिवस ‘सेलिब्रेट’ करून त्याला केक भरवून रात्रीच्या सुमारास घराकडे जात असतानाच तीन दुचाकींवर आलेल्या सहा आरोपींनी अवघ्या २३ वर्षीय युवकाशी दुचाकीचा कट लागल्याच्या कारणातून झालेल्या क्षुल्लक वाद जिवावर बेतला असून, युवकाच्या पोटात चाकू भोसकून त्याचा कोथळाच बाहेर काढून निर्घृण हत्या केली.

ही घटना रविवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास गोरसभंडार कॉलनीजवळ असलेल्या जुन्या आरटीओ मैदानालगतच्या रस्त्यावर घडली. अक्षय मनोज सोनटक्के (२३) रा. संत तुकाराम वॉर्ड रामनगर, असे मृतकाचे नाव असून पोलिसांनी ऋषिकेश दिनेश बहेणवाल (१८), नीलेश मनोहर पटेल (२९) यांना अटक करण्यात आली असून पाच अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. तसेच मुख्य आरोपी मयूर गिरी हा अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अमोल तामगाडगे रा. हिंदनगर याचा वाढदिवस असल्याने मृतक अक्षय सोनटक्के आणि त्याचे काही मित्र हे दुचाकीने जुन्या आरटीओ कार्यालयाजवळील मैदानात केक कापण्यासाठी गेले होते. अमोलने केक कापला असता सर्व मित्र त्याला केक भरवीत होते. दरम्यान मृतक अक्षय हा मैदानाबाहेर निघाला आणि दुचाकीने घरी जात असतानाच तुकडोजी मैदानाकडून आलेल्या तीन दुचाकी त्याच्याजवळ थांबल्या आणि दुचाकीला कट का मारला असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. तेवढ्यातच मुख्य आरोपी मयूर गिरी रा. आनंदनगर याने जवळील चाकू काढून अक्षयच्या मांडीवर असलेल्या ओटीपोटात भोसकला असता मृतकाचा कोथळाच बाहेर काढला. ही बाब वाढदिवस साजरा करणाऱ्या त्याच्या मित्रांना समजताच त्यांनी धाव घेत अक्षयला सेवाग्राम येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत स्पॉट पंचनामा करून प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे बयाण नोंदविले.

याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी पाच आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेतले तर ऋषिकेश दिनेश बहेणवाल आणि नीलेश मनोहर पटेल यांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी मयूर गिरी याचा शोध पोलीस उपनिरीक्षक विजय चन्नोर यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

‘तो’ ओरडत राहिला अन् ‘ते’ मारत राहिले...

मृतक अक्षय सोनटक्के याला आरोपी मयूर गिरी आणि त्याच्या इतर सात मित्रांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, मयूरने अक्षयला ‘मारा रे याला जास्त शहाणा झाला’ हे म्हणत जवळील चाकू काढून अक्षयच्या पोटात भोसकला. दरम्यान, अक्षय हा ‘मला वाचवा, वाचवा’ असा ओरडत होता. तेवढ्यातच वाढदिवस साजरा करणारे मित्र धावत गेल्याने आरोपीनी दुचाकीवरून धूम ठोकली.

पहाटे १ वाजेपर्यंत आरोपींची धरपकड

घटना घडताच रामनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी संदीप खरात आणि त्याच्यासोबतच्या कर्मचाऱ्यांनी पहाटे १ वाजेपर्यंत आरोपींची धरपकड केली. सात आरोपी पोलिसांना मिळून आले तर एका आरोपीचा शोध घेणे सुरु असल्याची माहिती आहे.

अप्पर पोलीस अधीक्षकांकडून पाहणी

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी घटनास्थळाला भेट देत तेथील परिस्थितीची पाहणी करुन पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच मृतक व आरोपींबाबतची संपूर्ण ‘हिस्ट्री’ काय याबाबतची माहिती जाणली.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

मृतक अक्षयला जिवे ठार मारल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. दरम्यान आरोपींनी त्याच परिसरात राहणारा आरोपी नीलेश मनोहर पटेल (२९) याला माहिती दिली. दरम्यान, नीलेशने घटनास्थळी जात रस्त्यावर पडून असलेल्या रक्तावर माती टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याच्यावरही गुन्हा दाखल करुन त्यास बेड्या ठोकल्या.

अन् अखेर मित्र हरले...

अक्षय सोनटक्के हा रक्ताच्या थारोळ्यात पडून असलेला त्याच्या मित्रांना दिसला. दरम्यान मित्र अमोल तामगाडगे, पवन मते, पंकज मिश्रा, श्यामसुंदर सिद्ध यांनी जखमी अक्षयला एम.एच.३१ बी.टी. ४०७५ क्रमांकाच्या दुचाकीवर बसवून जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यास सेवाग्राम येथे रेफर केले. त्याचे मित्र त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, डॉक्टरांनी मृत घाेषित केले. मित्रांनी अक्षयचा जीव वाचविण्यासाठी मोठे प्रयत्न केले. पण, अखेर ते हरल्याने अश्रू अनावर झाले.

‘मिनिट टू मिनिट’ हत्येचा घटनाक्रम...

- मध्यरात्री १२ वाजताच्या दरम्यान वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्र जमले.

- १२.१० वाजता सर्व मित्र दुचाकीवरून मैदानावर गेले.

- १२.१५ वाजता केक कापण्यात आला.

- १२.२० वाजता अक्षय हा मैदानाबाहेर गेला.

- १२.३० वाजता दुचाकीवर आलेल्या युवकांनी त्याच्यावर चाकूहल्ला केला.

- १२.३४ वाजता मित्रांनी दुचाकीवर बसवून सेवाग्राम रुग्णालयात नेले.

- १२.४५ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

- पहाटे ६.४१ वाजता रामनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: 23-year-old man stabbed to death while returning home on bike after celebrating a friend's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.