शिष्यवृत्तीचे २.३५ कोटी शिक्षण विभागाकडे जमा
By admin | Published: March 22, 2017 12:57 AM2017-03-22T00:57:08+5:302017-03-22T00:57:08+5:30
आदिवासी विद्यार्थ्याना शिक्षण घेताना आर्थिक अडचण जाऊ नये याकरिता शासनाच्यावतीने त्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
वर्धा : आदिवासी विद्यार्थ्याना शिक्षण घेताना आर्थिक अडचण जाऊ नये याकरिता शासनाच्यावतीने त्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्धेत मात्र तब्बल ७८४ शाळेतील विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपोटी २ कोटी ३५ लाख ४२ हजार ५०० रुपये प्राथमिक शिक्षण विभागाकडे जमा असल्याची माहिती प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाने दिली आहे. या शिष्यवृत्तीचे वाटप तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
शासनाच्या विशेष धोरणानुसार सन २०१५-१६ करीता सुवर्ण महोत्सवी आदिवासी माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेत जिल्ह्यातील १,०६५ शाळांमधील १६,०७३ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपोटी २ कोटी ५९ लाख ७ हजार ५०० रुपये एक वर्षापूर्वी मंजूर झाले आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडे जमा असलेल्या या रकमेतून केवळ २३ लाख ६५ हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.
१ हजार ६५पैकी २८१ शाळांना शिष्यवृत्ती
वर्धा : जिल्ह्याला प्राप्त झालेल्या रक्कमेतून १,०६५ पैकी केवळ २८१ शाळातील विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यामुळे अजूनही ७८४ शाळेतील विद्यार्थी लाभापासून वंचित आहेत. यामुळे अजूनही २ कोटी ३५ लाख ४२ हजार ५०० रुपये शिक्षण विभागाकडे जमा असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मारूती उईके यांनी दिली आहे.
सन २०१५-१६ ची शिष्यवृत्ती सन २०१६-१७ संपत आली तरी अद्याप वितरीत झाली नाही. याबाबत प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे राज्याध्यक्ष अरूणकुमार हर्षबोधी यांनी मुख्यकार्यकारी नयना गुंडे यांना विचारणा केली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे व प्राथमिक शिक्षणाधिकारी शेंडे यांनी आदिवासी विभाग, नागपूर यांच्याकडे माहे फेब्रुवारी २०१७ पर्यंत मंजूर शाळा व विद्यार्थ्यांची यादी प्राप्त न झाल्यामुळे ही शिष्यवृत्ती वितरणास विलंब झाल्याचे समोर आले आहे. परंतु, आता शाळा विद्यार्थ्यांची यादी प्राप्त झाल्यामुळे ३१ मार्च २०१७ पूर्वी संपूर्ण शिष्यवृत्तीचे वितरण करण्याचे आश्वासन त्यांनी हर्षबोधी यांना दिले.
याचवेळी ३१ मार्च पर्यंत ही शिष्यवृत्ती वितरीत न झाल्यास प्रजासत्ताकतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा ईशाराही संघटनेद्वारे देण्यात आला. यावेळी संघटनेचे श्रीराम मेंढे, प्रकाश कांबळे, अरविंद माणिककुळे, धनंजय नाखले, सुनील तेलगोटे, मारोती उईके आदींसह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते(प्रतिनिधी).