एटीएम मशीन फोडून ‘सिनेस्टाईल’ पळविली २३.७८ लाखांची रोकड; घटना सीसीटीव्हीत कैद
By चैतन्य जोशी | Published: August 29, 2022 04:38 PM2022-08-29T16:38:11+5:302022-08-29T16:44:50+5:30
वायगाव येथील घटनेने खळबळ; बोरगावातही झाला एटीएम फोडण्याचा प्रयत्न
वर्धा : एटीएममध्ये प्रवेश करुन गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीनचा समोरील भाग कापून तब्बल २३ लाख ७८ हजार ८०० रुपयांची रोकड चोरट्यांनी सिनेस्टाईल पळविली. ही घटना वायगाव (नि.) येथील बाजार चौकात २८ रोजी मध्यरात्री १.३० ते २.३० वाजताच्या दरम्यान घडली. विशेष म्हणजे काही तासांपूर्वी वर्धा नजीकच्या बोरगावातही एटीएम मशीनमध्ये चोरीचा प्रयत्न फसला.
बोलेरो वाहनाने अज्ञात चोरटे वायगाव येथे पोहचले. मध्यरात्रीच्या सुमारास बाजार चौकात असलेल्या एसबीआय कंपनीच्या एटीएममध्ये चोरट्यांनी प्रवेश केला. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील २३ लाख ७८ हजार ८०० रुपयांची रोकड चोरुन सिनेस्टाईल पळ काढला.
हा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांनी वायगाव गाठून घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी देवळी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचे १० पथक चोरट्यांच्या शोधात...
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्याच्या तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अशी तब्बल १० पथके आरोपींच्या शोधार्थ रवाना झाली आहे. महामार्गावर नाकाबंदी देखील करण्यात आली आहे. चोरटे पुलगावमार्गे अमरावती जिल्ह्यात पसार झाल्याची माहिती आहे.