२४ तासात लावला जबरी चोरीचा छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 09:55 PM2019-05-10T21:55:07+5:302019-05-10T21:55:32+5:30
मारहाण करून दुचाकीसह मोबाईल व रोख रक्कम चोरून नेल्या प्रकरणी तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आपल्या तपासाला गती दिली. शिवाय अवघ्या २४ तासाच्या आत आरोपी असलेल्या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मारहाण करून दुचाकीसह मोबाईल व रोख रक्कम चोरून नेल्या प्रकरणी तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आपल्या तपासाला गती दिली. शिवाय अवघ्या २४ तासाच्या आत आरोपी असलेल्या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, बंडू मोहन भाजीखाये रा. हिंगणघाट हे नागसेननगर वर्धा येथून एम.एच.४० बी.एस. ४०५४ क्रमांकाच्या वाहनाने वाहन दुरूस्तीकरिता केसलीमल कन्या शाळेजवळील एका व्यावसायिक प्रतिष्ठानात जात होते. दरम्यान तीन ते चार अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या ताब्यातील वाहनाने बंडू याला कट देत खाली पाडले. त्यानंतर त्यांनी बंडू यांना मारहाण करून त्यांच्याजवळील वाहन, मोबाईल व ३ हजार रुपये रोख असा एकूण ६३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी बंडू भाजीखाये यांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेतल्यानंतर सदर प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वळता करण्यात झाला. त्यानंतर पोलिसांनी आपल्या हालचालींना वेग देत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी निरज मोरेश्वर मडकाम (२४), दीपक हरिदास तडस (२१) दोन्ही रा. न्यू रेल्वे कॉलनी याला सुरूवातीला ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून पोलिसांनी चोरीचा मोबाईल व रोख ३ हजार रुपये जप्त केले. त्यानंतर त्याच्याच कबुलीवरून पोलिसांनी नागसेननगर येथील राकेश वसंतराव सयाम (१९) यास ताब्यात घेतले. चोरीचे वाहन आरोपींनी संगणमत करून १५ हजार रुपयांमध्ये गहाण ठेवल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास वर्धा शहर पोलीस करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. तेली, अपर पोलीस अधीक्षक पिंगळे, स्था.गु.शाखेचे पीआय निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पोहवा निरंजन वरभे, यशवंत गोल्हर, रितेश शर्मा, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेश आष्टनकर आदींनी केली.