२४ जणांचे मुंडण, युवक काँग्रेसचा मोर्चा

By admin | Published: September 19, 2015 03:19 AM2015-09-19T03:19:40+5:302015-09-19T03:19:40+5:30

तालुक्यातील तळेगाव(टा.) ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषण ...

24 people's Mundana, Youth Congress Front | २४ जणांचे मुंडण, युवक काँग्रेसचा मोर्चा

२४ जणांचे मुंडण, युवक काँग्रेसचा मोर्चा

Next

तळेगाव प्रकरण : सीईओ अहवालावर सुनावणी घेणार
वर्धा : तालुक्यातील तळेगाव(टा.) ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषण आंदोलनादरम्यान शुक्रवारी आंदोलकांसह २४ जणांनी मुंडण करून आंदोलनाची धार तीव्र केली आहे.
देवळी-पुलगाव विधानसभा युवा काँग्रेसने मोर्चाच्या माध्यमातून जि.प.वर धडक दिली. शिष्टमंडळाने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिना यांची घेतली. याप्रसंगी सीईओ मिना यांनी चौकशी अहवाल दुपारपर्यंत जाहीर करण्याची ग्वाही दिली होती, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. या अनुषंगाने आंदोलक अहवालाची वाट बघत होते.
मोर्चात माजी जि.प. अध्यक्ष विजय जयस्वाल, कॉग्रसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, जि.प. गटनेते मारेश्वर खोडके, जि.प. सदस्य मनोज चांदुरकर, मोहन शिरोडकर, निलिमा दंढारे, वर्धा पं.स. सभापती कुंदाताई भोयर, पुलगाव नगराध्यक्ष मनीष साहु, माजी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश तेलरांधे, लोकसभा महासचिव सुधीर वसु, जावेद खान, एनएसयुआय अध्यक्ष हितेश इंगोले, विधानसभा महासचिव मोहन नावाडे, धिरज भोयर, सचिन गुप्ता, सोनू गावंडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
उपोषणात माजी सरपंच माणिकराव भोयर यांनी आज सहभाग नोंदविला. मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनीही उपोषण मंडपाला भेट घेऊन उपोषणकर्त्यांची मागणी समजून घेतली. यानंतर त्यांनीही आंदोलनाला पाठींबा जाहीर केला आहे. वाढता पाठींबा बघता आंदोलन दिवसागणिक तीव्र होत असल्याचे दिसून येते. या अनुषंगाने प्रशासनानेही आता गंभीर पाऊले उचलायला सुरुवात केल्याचे समजते. १५ सप्टेंबरपासून तळेगावातील १७ ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केले. यानंतर आंदोलकांची संख्या वाढतच आहे. आंदोलनाला चार दिवस लोटले असून अद्याप तोडगा निघालेला नाही. अशातच आज आंदोलकांनी सामूहिक मुंडण करून आंदोलनाची तीव्रता वाढविली. यामध्ये उल्हास सुरकार, हिरामण कांबळे, हर्षल पाटील यांनी स्वयंस्फूर्तीने मुंडण केले.(जिल्हा प्रतिनिधी)
आमदारही आंदोलनात उतरणार
जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या तळेगाव ग्रामस्थांच्या आंदोलनाचे वाढते गांभीर्य लक्षात घेऊन काँग्रेसनेही आपला पाठींबा जाहीर केला आहे. आता देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार रणजित कांबळे हे सुद्धा या आंदोलनात उतरणार असल्याची माहिती आहे. ते सीईओंच्या अहवालाबाबत शनिवारी चर्चा करुन आंदोलनाची पुढील रुपरेषा ठरविणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाच्या सूत्राने ‘लोकमत’ली दिली.
मनसेचीही आंदोलनात उडी
आंदोलनाला सुरुवातीपासूनच विविध राजकीय पक्षांचा वाढता पाठींबा मिळत आहे. या आंदोलनात आता मनसेनेही उडी घेतली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी शुक्रवारी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आपला पाठींबा जाहीर केला आहे.
आज आंदोलनाची सांगता होण्याची शक्यता?
आंदोलनाला चार दिवस उलटले असले तरी आंदोलनाची तीव्रता वाढतच आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहे. यावरुन शनिवारी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघण्याची शक्यता वर्तविली आहे.

Web Title: 24 people's Mundana, Youth Congress Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.