वर्धा : ११८ ग्रामपंचायतींच्या २४५ आशा स्वयंसेविकांना मिळाली एचबीएनसी कीट
By महेश सायखेडे | Published: February 27, 2023 07:08 PM2023-02-27T19:08:15+5:302023-02-27T19:08:47+5:30
जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या सूचनांना ग्रामपंचायतींचा प्रतिसाद
वर्धा : बालकांची घरच्या घरी काळजी कशी घ्यावी, याबाबत उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आशा स्वयंसेविकांना विशिष्ट वस्तूंची कीट उपलब्ध करून देणे आवश्यक असते. ग्रामपंचायतींनी आपल्या स्तरावर ही कीट उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना मुख्य कार्यपालन अधिकारी रोहन घुगे यांनी केली होती. त्याला चांगला प्रतिसाद देत ११८ ग्रामपंचायतींनी २४५ आशांना ही कीट उपलब्ध करून दिली आहेत. लवकरच सर्वच आशा स्वयंसेविकांना ही कीट उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात आशा स्वयंसेविका योजनेची अंमलबजावणीसाठी प्रयत्न करतात. ग्रामीण भागामध्ये १ हजार ३३ आशा स्वयंसेविका ही योजना प्रभावीपणे राबवीत आहेत. या योजनेंतर्गत आशा स्वयंसेविकांना विविध स्वरूपाच्या आरोग्य विषयक कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात एचबीएनसी अर्थात घरच्या घरी बालकांची कशी काळजी घ्यावी, या कार्यक्रमाचा समावेश आहे. आशा स्वयंसेविकांना एचबीएनसी कार्यक्रमांतर्गत नवजात बालकांच्या घरी जाऊन गृहभेट देणे व भेटीच्या दरम्यान बालकाला पकडण्यापूर्वी हात धुण्याचे प्रात्यक्षिक, बाळाचे वजन, तापमान घेणे, बाळाला उबदार ठेवण्याच्या पद्धती मातेला समजावून सांगणे, श्वासाची गती मोजणे, आदी कृती आशा स्वयंसेविकांना कार्यक्रम दरम्यान करावयाच्या असतात. त्यादृष्टीने आशा स्वयंसेविकेकडे एचबीएनसी कीट व त्यामध्ये डिजिटल घड्याळ, डिजिटल थर्मामीटर, वजन काटा, नवजात बाळाकरिता छोटे ब्लॅंकेट, फीडिंग चम्मच, साबन, साबणाचा डब्बा हे साहित्य आवश्यक आहे. ग्रामपंचायत स्तरावरील उपलब्ध अनुदानातून आशा स्वयंसेविकांना एचबीएनसी कीट उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सूचना केल्या होत्या. या सूचनेला चांगला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ११८ ग्रामपंचायतीने आपल्या गावातील २४५ आशा स्वयंसेविकांना एचबीएनसी कीट उपलब्ध करून दिल्या आहे.
समुद्रपूर तालुका अव्वल
समुद्रपूर तालुक्यातील ७१ पैकी ६५ ग्रामपंचायतींनी ११८ आशा स्वयंसेविकांना एचबीएनसी कीट उपलब्ध करून दिली आहे. हिंगणघाट तालुक्यात ७६ पैकी ३६ ग्रामपंचायतींनी ६३ आशांना कीट उपलब्ध करून दिली, तर वर्धा तालुक्यात ७६ पैकी सात ग्रामपंचायतींमधील ४४ आशा स्वयंसेविकांना किट उपलब्ध करून दिली असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंतचा विचार केल्यास एचबीएनसी कीट उपलब्ध करून देण्यात समुद्रपूर तालुका अव्वल असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
बाल मृत्यू रोखण्यासाठी होणार मदत
जिल्ह्यातील सर्वच आशा स्वयंसेविकांना एचबीएनसी कीट उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रोहन घुगे यांनी ग्रामपंचायतीला सूचना दिल्या आहे. कीट उपलब्धतेमुळे गावपातळीवर आशा स्वयंसेविकांना आपल्या कार्यक्षेत्रातील नवजात बालकांना आरोग्यविषयक सेवा देण्यास सोयीचे होणार आहे. बाल मृत्यू दर, अर्भक मृत्यू दर कमी होण्यास देखील मोठी मदत होणार आहे.